अखेर कांचन डेव्हलपर्स आणि आल्कन स्टायलसच्या बिल्डर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

    दिनांक :29-Jun-2019
पुणे :  रात्री दीडच्या सुमारास पुण्यातील कोंढवा भागात आल्कन स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला.  या प्रकरणी आता आल्कन स्टायलस आणि कांचन बिल्डर्सच्या एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बिल्डर्सवर कारवाईचा मुद्धा सकाळपासूनच माध्यमांनी उचलून धरला होता.  अखेर पोलिसांनी आल्कन स्टायलस आणि कांचन बिल्डर्स या दोहोंच्या आठ जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
 
 
मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच भिंत खचू शकते या संदर्भातली तक्रार प्रशासनाकडे इमारतीत राहणाऱ्या लोकांनी केली होती. मात्र महापालिका प्रशासनाने या प्रकरणी दुर्लक्ष केले असाही आरोप स्थानिक रहिवाशांनी केला. आल्कन स्टायलसचे पाच भागीदार बिल्डर जगदीशप्रसाद अग्रवाल, सचिन जगदीशप्रसाद अग्रवाल, राजेश जगदीशप्रसाद अग्रवाल, विवेक सुनील अग्रवाल आणि विपुल सुनील अग्रवाल या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आल्कन स्टायलस या सोसायटीची संरक्षक भिंत तात्पुरत्या शेडमध्ये झोपलेल्या मजुरांच्या अंगावर कोसळली. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात चांगलाच पाऊस होतो आहे. त्यामुळे आल्कन स्यायलस या इमारतीची संरक्षक भिंत खचली होती. ती कोसळल्यानेच पंधरा जणांचा बळी गेला. या प्रकरणी आता आल्कन स्टायलर्स आणि कांचन बिल्डर्सच्या एकूण आठजणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन बिल्डर्सच्या पंकज व्होरा, सुरेश शहा आणि रश्मीकांत गांधी या तिघांविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसंच साईट इंजिनिअर , साईट सुपरवायझर आणि मजूर पुरवणारा कंत्राटदार यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्यात आला. यांच्या बांधकाम प्रकल्पावर हे मजूर काम करत होते आणि तिथेच रहात होते.
दरम्यान या ठिकाणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भेट दिली. ते कोल्हापुरातून पुण्यात आले होते. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. याशिवाय खासदार गिरीश बापट, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या ठिकाणी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी २५ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.