इंडो -पॅसिफिक भागात स्थिरतेसाठी अमेरिका-भारत-जपान चर्चा

    दिनांक :29-Jun-2019
 ओसाका, 
अमेरिका, भारत व जपान यांची त्रिपक्षीय बैठक जपानमधील ओसाका येथे जी २० परिषदेच्या निमित्ताने झाली. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पंतप्रधान नरेंद्र मोदी व जपानचे समपदस्थ शिन्जो आबे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यात, इंडो-पॅसिफिक प्रदेशातील स्थिती, पायाभूत विकास, हवाई वाहतुकीने जोडणी या मुद्दय़ांचा समावेश होता.
 
 
 
तीनही देश एकत्र येऊन इंडो पॅसिफिक भागात खुले, स्थिर व नियमाधिष्ठित वातावरण कसे तयार करू शकतील यावर भर देण्यात आला. जपान-अमेरिका-भारत यांच्या बैठकीत मोदी यांनी भारताच्या दृष्टीने हा त्रिपक्षीय गट महत्त्वाचा असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, शांतता व सुरक्षा, जोडणी या दृष्टिकोनातून इंडो पॅसिफिक भागात एकत्र काम करण्यावर तीनही देशांनी भर दिला असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे व भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. आजची त्रिपक्षीय बैठक यशस्वी झाली असून त्यात व्यापक विषयांवर चर्चा झाली, असे मोदी यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे. तीन देशांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची ही दुसरी वेळ होती, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर मोदी यांनी स्वतंत्रपणे ट्रम्प यांची भेट घेतली.