पंतला एकतर संधी द्या...

    दिनांक :29-Jun-2019
 श्रीपाद पंचभाई 
विश्वचषक स्पर्धेत सध्यातरी भारतीय संघ जबरदस्त कामगिरी करत आहे. कर्णधार विराट कोहली, जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आपल्या उच्च कोटीच्या खेळाचे प्रदर्शन करुन प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. धोनी, पांड्‌या आणि रोहीत शर्मा हे ही आपलं कर्तव्य सक्षमपणे बजावत आहेत. भारतीय संघासमोर सध्या नंबर चार वर कोण खेळणार हा प्रश्न अजुनही संघ व्यवस्थापनासमोर पडला आहे. स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सलामीविर शिखर धवनच्या जागी संघात आलेला धडाकेबाज यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अजुनही संघात खेळण्याच्या संधीची प्रतिक्षा करत आहे. 

 
 
विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि इंग्लड या दोन संभाव्य विजेत्यांमध्ये बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर स्पर्धेतील 38 वा सामना होत आहे. या सामन्यात पंतला अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. विजय शंकरने या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्याला आणखी संधी न देता पंतला संघात घेणे कर्णधार कोहलीसाठी फायद्‌‌‌याचा सौदा ठरु शकते. कारण, यानंतर भारताला बांग्लादेश आणि श्रीलंकेविरुद्ध खेळायचे आहे.या दोन्ही संघानी आपल्या क्षमतेनुसार कामगिरी केलेली नाही आणि इंग्लंडविरुद्धची लढत पंतला संधी देण्यासाठी उत्तम आहे. स्पर्धेत भारताचे सहा सामन्यात 11 गुण झालेले आहे. यजमानांना त्यांच्याच मायभूमित पराभूत करुन आत्मविश्वासाने उपांत्य फेरी गाठणे ‘टीम इंडीयाचे’ प्रमुख लक्ष राहणार आहे.
 
भारतीय संघात इंग्लंडविरुद्ध पंतला संधी मिळाली नाही, तर त्याला उर्वरित सामन्यात कोणत्या संघाविरुद्ध मैदानात उतरवणार हे संघव्यवस्थापन आणि कर्णधारच जाणे..!