दहशतवाद रोखण्याचा ‘ब्रिक्स’ नेत्यांचा निर्धार

    दिनांक :29-Jun-2019
- संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर सर्वंकष धोरण ठरवण्यावर भर
ओसाका,
भारतासह ब्रिक्स देशांनी सर्व देशांना दहशतवादाचा अर्थपुरवठा रोखण्याचे आवाहन केले असून कुणीही आपल्या भूमीतून दहशतवादी कारवाया होऊ देऊ नयेत, असा निर्धार व्यक्त केला आहे. ‘जी २०’ देशांच्या शिखर बैठकीनिमित्ताने ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या प्रमुखांनी एकत्र येऊन चर्चा केली. त्यात इंटरनेटचा दहशतवादी कारवायांसाठी होणारा वापर रोखण्याचे ठरवण्यात आले.

 
 
संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे, की ब्रिक्स देशांच्या वतीने दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यात येत असून हा दहशतवाद कुठल्याही प्रकारचा असो, कुठल्याही भूमीतून झालेला असो तो निषेधार्हच आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठावर एकत्र राहून सर्वंकष धोरण ठरवण्यावर भर देण्यात येत आहे.
कुठल्याही देशाचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह पाच नेत्यांनी दहशतवाद्यांचा अर्थपुवठा रोखणे व त्यांना आपल्या देशातून दहशतवादी कारवाया करण्यापासून रोखणे या दोन्ही गोष्टी रोखण्याची जबाबदारी त्या- त्या देशावर राहील असे स्पष्ट केले.
सध्या इंटरनेटचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात असून माहिती व दूरसंचार तंत्रज्ञानात सुरक्षितता आणण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञान कंपन्यांनी विविध देशांच्या सरकारांना त्यांच्या कायद्यानुसार मदत करावी, असे निवेदनात म्हटले आहे.