लुटणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; वरिष्ठांकडून पोलिसांचे स्वागत

    दिनांक :29-Jun-2019
चिखली पोलिसांची यशस्वी कामगिरी
चिखली : चिखली पोलिसांच्या कडे सन २०१९ या चालू वर्षात शहर व परिसरातील रस्त्यावर नागरीकांना अडवून लुटमारी करण्याच्या तक्रारी आल्या होत्या . या तक्रारीची गंभीरतेने दखल घेत चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ व त्यांचे सहकारी पोलिसांनी चालविलेल्या तपासकामास यश आले असून वाटमारीच्या एकून सात प्रकरणांची उकल झाली आहे. यामध्ये आठ आरोपींना अटक करण्यात आली असून चोरटय़ांकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 

 
 
तालुक्यातील चिखली हे प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरीकांची नियमितपणो ये-जा सुरू असते. शहरातील कामे आटोपल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास घराकडे परतणारे नागरीकांना निर्जनस्थळी गाठून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील पैसे, साहित्य, दाग-दागिने, मोबाईल आदी लुटण्याचे प्रकार गत काही दिवसांत वाढले होते. या घटना प्रामुख्याने चिखली-बुलडाणा रोडवरील केळवद आणि हातणी या गावाजवळ तर काही स्थानिक एमआयडी परिसर, खडकपुरा सराफा गल्ली, बस स्थानक, जाफ्राबाद रोड, महाबिजच्या पाठीमागील रस्ता आदी भागात घडत होत्या. यामध्ये २ फेब्रुवारी, ४ मार्च, ८ एप्रिल, ३ व ३० मे, १ व १० जून रोजी घडलेल्या लुटमारीच्या तक्रारी चिखली पोलिसांत दाखल झाल्या होत्या. या तक्रारींवरून चिखली पोलिसांनी तपास चालविला होता. दरम्यान या प्रकरणात आरोपींचा काहीच सुगावा लागत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. त्यामुळे या गुन्हय़ांची उकल करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे , उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी पोलिस स्टेशन स्तरावर पथके स्थापन करून आरोपींच्या गुन्हे करण्याची पध्दती, बोलचाल, वापरलेल्या दुचाक्या आदींचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर दोन जलदगती तपास पथके तयार केली. या पथकाने तपासाचे चक्रे फिरवून गोपनिय माहिती मिळविल्यानंतर अत्यंत शिताफीने सापळा रचून वेगवेगळय़ा गुन्हय़ातील आठ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये सुभान हसन चौधरी, गणेश भारत फोलाने, अजय जाकीराम बिथरे, ऋषीकेश भारत जैयवाल रा.संभाजी नगर चिखली, पप्पु उर्फ आनंद गुलाबराव अनपट रा.गोरक्षणवाडी चिखली, अविनाश जानकीराम शिंगणे रा.रोहीदास नगर चिखली, विधी संघर्ष बालक, सैय्यद समीर सैय्यद जहीर रा.गोरक्षणवाडी चिखली या आठ आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये गुन्हय़ांत चोरलेले १७ हजार रूपये रोख, २० हजार ९९० रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन असे रु ३७९९० चा मुदेमाल , गुन्हय़ात वापरलेल्या तीन दुचाक्या, एटीमएम कार्ड आदी मुद्देमालाचा समावेश आहे. पोलिसांच्या तपास पथकात ठाणेदार गुलाबराव वाघ, पोउपनि प्रविण सोनवणे , मोहन पाटील, पोहवा नारायण तायडे, प्रकाश पाटील, नापोकाँ शरद गिरी, राजू सोनवणे , गजानन जाधव, सदानंद चाफले, , पोकाँ भारत पोफळे आदी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
चिखली पोलिसांच्या या कामगिरीबद्दल, जिल्हा पोलिस अधिक्षक दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलिस अधिक्षक संदीप डोईफोडे , उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी यांनी समाधान व्यक्त केले आहे. तर या यशस्वी कामगिरीबद्दल २९ जून रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी बी.बी.महामुनी यांनी ठाणेदार गुलाबराव वाघ व पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.