सलग दुसऱ्या दिवशी पावसाचे धुमशान, रेल्वे, विमानसेवेवर परिणाम

    दिनांक :29-Jun-2019
मुंबई,
मुंबई-ठाणेकरांना प्रतिक्षा करायला लावणाऱ्या पावसाने अखेर जोरदार हजेरी लावली असून आज सलग दुसऱ्या दिवशीही बॅटिंग सुरू ठेवली आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवांवर परिणाम झाला असून तिन्ही मार्गावरील लोकल्स १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई-पालघरमध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर अंबरनाथ येथे रिक्षा स्टँडवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
 
 
आजही दुसऱ्या दिवशी मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे या परिसरातील अनेक सखल भागात पाणी साचले. तर मुंबईत सहा ठिकाणी घरांची पडझड झाली. त्यात तीनजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात आलं. पावसामुळे मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेसेवेवरही परिणाम झाला. पावसामुळे तिन्ही मार्गावरील वाहतूक १० ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वे १५ ते २० मिनिटे तर हार्बर रेल्वे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असून लोकलपाठोपाठ मुसळधार पावसाचा एक्सप्रेस गाड्यांवरही परिणाम झाला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, विक्रमगडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलीय. वसई आणि विरारपरिसरातील सखल भागात पाणी साचल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क आणि तुलिंज येथेही पाणी भरल्याने अनेकांना घराबाहेर पडणं कठिण झालं आहे.
मुंबईतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. हिंदमाता, अंधेरी सबवे, मालाड सबवे,साकीनाका, सायन, माटुंगा लेबर कँम्प आणि मिलन सब-वे आदी भागात आजही काही प्रमाणात पाणी तुंबले आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरही पाणी भरले आहे. रेल्वे प्रमाणेच पावसामुळे विमानसेवाही १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचं सांगण्यात आलं. सायन कोळीवाड्याच्या पंजाब कॅम्पमध्ये आज सकाळी झाड कोसळल्याने टॅक्सी आणि कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.