घरात कोणती चित्रं नसावी?

    दिनांक :29-Jun-2019
घर सजवायला कोणाला आवडत नाही? महागड्या फर्निचरसोबत घरात छानशी चित्रं लावली जातात. वेगवेगळ्या चित्रांनी भिंती सजवल्या जातात. आपल्या आसपासची प्रत्येक वस्तू आणि व्यक्ती ब्रह्मांडातल्या शक्तींना आकर्षित करत असते. आपल्या आसपास नकारात्मक ऊर्जा असेल तर विपरित परिस्थितीचा सामना करावा लागतो. म्हणूनच सकारात्मक विचार असणार्‍या व्यक्ती आणि सकारात्मकता निर्माण करणार्‍या वस्तूंना जवळ करणं गरजेचं ठरतं. वास्तूशास्त्राच्या दृष्टीने ठराविक प्रकारची चित्रं अयोग्य मानली जातात. अनावधानानेकिंवा पुरेशा माहितीअभावी अशी चित्रं आपण घरात लावतो आणि नकारात्मक ऊर्जेला आकर्षित करतो. घरात कोणती चित्रं लावणं योग्य ठरत नाही, याविषयी जाणून घेऊ या...
 

 
 
* वाहत्या पाण्याचं चित्रकिंवा कृत्रीम धबधबा घरात ठेऊ नये. वाहतं पाणी अस्थिरतेचं प्रतीक समजलं जातं. वाहतं पाणी, धबधबा किंवा नदीचं चित्र घरात असेल तर संपत्ती आणि प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. अशा चित्रांमुळे पैसा हाती रहात नाही. खर्च वाढतात आणि बचत होत नाही.
* घरात किंवा कार्यालयात बुडणार्‍या जहाजाचं चित्र लावू नये. अशा प्रकारच्या चित्रांमुळे नकारात्मक तरंग उमटू लागतात आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर जाते. अशा चित्रांमुळे भाग्योदय होत नाही.
* घरात हिंस्त्र प्राण्यांची चित्र लावू नये. यामुळे घरात कलह संभवतो. पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. नाहक वाद होतात.
* ताजमहाल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. अनेकांच्या घरात ताजमहालाचं चित्र असतं. पण ताजमहाल ही मुमताजची कबर आहे हे आपण विसरतो. घरात कबरीचं चित्र असू नये. यामुळे मृत्यू किंवा विनाश संभवतो.
* घरात महाभारतातील प्रसंगांची चित्रं लावू नयेत. महाभारत हे महाकाव्य असलं तरी यात एकमेकांविरूद्धचा द्वेष, राग, लोभ दिसून येतो. अशा चित्रांमुळे ताण, नैराश्य, दु:ख अशा भावना वाढीस लागतात. तसंच घरात कलह संभवतो.
* घरात दु:खी, कष्टी लोकांची चित्रं लावू नयेत. अशी चित्र अशुभ असतात.
* युद्ध, हिंसा दाखवणारी चित्र घरात नसावी. ही चित्रं नकारात्मक ऊर्जा घेऊन येतात. यामुळे माणसं दुरावतात.
 
 
* नृत्यकलेत निपुण असणारेे अनेक जण घरात नटराजाची मूर्ती ठेवतात. नटराजाचं चित्रं आणि फोटोही त्यांच्या घरात असतो. पण प्रत्यक्षात नटराजाचं नृत्य हे संहाराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नटराजाचं चित्र किंवा मूर्ती घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.