वरोडा पोलिस ठाण्यात शिपायाची आत्महत्या

    दिनांक :29-Jun-2019
वरोडा: वरोडा येथील पोलिस ठाण्याच्या खोलीत पोलिस शिपायाने गळफास लावून आत्महत्या केल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवार, 29 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुरेश दादाजी बांबोळे असे मृतक शिपायाचे नाव आहे.
वरोडा पोलिस ठाणे अंतर्गत सुरेश बांबोळे हा पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होता. एका वर्षापूर्वी तो ब्रम्हपुरी येथून वरोड्याला स्थानांतरित झाला होता. मागील दोन महिन्यांपासून तो विनापरवानगीने गैरहजर होता. या दरम्यान, तो कुटुंबियांसोबत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे कुटुंबिय ब्रम्हपुरी येथे वास्तव्यास असून, बदली मिळावी म्हणून अधिकार्‍यांकडे अर्जही केला होता. शुक्रवारला तो सायंकाळच्या सुमारास पोलिस ठाण्यात आल्याचे त्यांच्या सहकार्‍यांनी सांगितले. मात्र, कुणासोबत न बोलता तो निघून गेला. वरोडा येथे गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती असल्यामुळे त्या खोलीची चावी त्यांच्याकडे होती. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास तो त्या ठिकाणी आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. कारण, सकाळी 6.10 वाजताच्या सुमारास त्यांनी त्यांची मुलगी सेजल हिला व्हॅट्सअ‍ॅप संदेश पाठवून मी आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. मी तुम्हाला पैसे देवू शकलो नाही तसेच आपली बदलीही करू शकलो नाही म्हणून मी गळफास लावून जीवनयात्रा संपवित असल्याचे त्यांनी संदेशात नमूद केले आहे.
सकाळी 9 वाजताच्या सुमारास पोलिस कर्मचार्‍यांनी खोलीचे दार उघडताच त्यांना बांबोळे यांनी गळफास लावल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती पोलिस अधिकार्‍यांसह वरिष्ठांना देण्यात आली. मृतकाच्या कुटुंबियांनी सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची मागणी केली. त्यामुळे वृत्तलिहिपर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते.