पुण्यात भिंत कोसळून १५ मजुरांचा मृत्यू

    दिनांक :29-Jun-2019
मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर
 
पुणे,
पुण्यातील कोंढवा भागात भिंत कोसळून १५ कामगारांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तर ढिगाऱ्याखालून तीन जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाचे पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

 
मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले असून आणखी काही लोकही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनातून मृतांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर करण्यात आली. पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत माहिती दिली आहे.

 
पुण्यातील बडा तालाब मस्जिद भागात आल्कन स्टायलस सोसायटीच्या कंपाऊंड वॉलला लागून मजुरांनी झोपड्या उभारल्या होत्या. शुक्रवारी रात्री दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे सोसायटीचे कपाऊंड खचले आणि मजुरांच्या कच्च्या घरांवर ही भिंत कोसळली आणि त्यामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला. या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांच्या या झोपड्या होत्या.
 
पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्यायलस या सोसायटीची भिंत कोसळली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या मुलीचा आणि एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.
 
 
हे बांधकाम नेमकं कोणत्या बिल्डरकडून करण्यात येत होते त्याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पावसामुळे ही भिंत खचली आणि ती कोसळून १५ मजुरांचा मृत्यू झाला. हे सगळे मजूर बिहारहुन या ठिकाणाहून आले होते अशीही माहिती मिळाली आहे.
 
मृतांची नावे
१) आलोक शर्मा (वय २८) २) मोहन शर्मा (वय-२४) ३) अमन शर्मा (वय १९) ४) रवि शर्मा (वय-१९) ५) लक्ष्मीकांत सहानी (वय-३३) ६) सुनील सिंग (वय-३५) ७) ओवी दास (वय-२) ८) सोनाली दास (वय-६) ९) भीमा दास (वय-३८) १०) संगिता देवी (वय-२६) ११) अजितकुमार शर्मा (वय-७) १२) रेखालकुमार शर्मा (वय-५) १३) निवा देवी (वय-३०) १४) दीपरंजन शर्मा १५) अवदेश सिंग
 
दरम्यान या प्रकरणी मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.