‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गॅलरीत शिरलं पाणी

    दिनांक :29-Jun-2019
जगातला सर्वात भव्य पुतळा अशी ख्याती असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गॅलरीत पावसाचं पाणी शिरलं आहे. पहिल्या पावसामुळे हे पाणी शिरलं आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे. गुजरातमध्ये नर्मदा धरणाजवळच्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या पुतळ्याच्या गॅलरीत पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळे या ठिकाणी भेट द्यायला आलेले पर्यटक काहीसे नाराज झाले आहेत. या संदर्भातला एक व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
 
 
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ उभारल्यानंतर पहिल्यांदाच हा पुतळा पावसाचा सामना करतो आहे. अशात या पुतळ्याच्या गॅलरीमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनीही ही बाब मान्य केली आहे. काही कोपऱ्यांमधून पाणी पुतळ्याच्या गॅलरीत आलं आहे. मात्र हा काही आमचा दोष नाही, वाहत्या वेगवान वाऱ्यामुळे हे पाणी आले. ज्या ठिकाणाहून पाणी आले त्या जागा झाकण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत असेही जिल्हाधिकारी आय. के. पटेल यांनी म्हटले आहे.
 
 
मागील दोन दिवसांपासून गुजरात, महाराष्ट्र या ठिकाणी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत तर शुक्रवारी झालेल्या पावसाने दाणादाण उडवली. लोकल सेवा आणि रस्ते वाहतूक या दोन्हीवर परिणाम झाल्याचं दिसून आलं. आता आज स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात ऐक्याचं प्रतीक असलेला सरदार पटेल यांच्या भव्य पुतळ्यच्या गॅलरीत पावसाचं पाणी शिरलं आहे.