जगनमोहन सरकारची धडाकेबाज सुरुवात, आशा कामगारांच्या मानधनात ७ हजारांची वाढ

    दिनांक :03-Jun-2019
हैदराबाद,
आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणुकांच्या प्रचारावेळी आपल्या भाषणातून दिलेले आश्वासन जगनमोहन यांनी पूर्ण केले. जगनमोहन सरकारने दणक्यात सुरुवात करत राज्यातील आशा वर्कर्संच्या मानधनात घसघशीत वाढ केली आहे. त्यानुसार, यापूर्वी 3 हजार रुपये वेतन घेणाऱ्या आशा वर्कर्संना आता 10 हजार रुपये वेतन मिळणार आहे.
 
 
आरोग्य विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या बैठकीत जगनमोहन यांनी ही घोषणा केली. तसेच, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आदेशही देण्यात आले आहेत. ग्रामीण स्तरावरील आशा वर्कर्स यांच्या कामाचे महत्व आणि त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री जगनमोहन यांनी हा निर्णय घेतला आहे. जगनमोहन यांच्या प्रजा संकल्प यात्रेवेळी, काही आशा वर्कर्संने भेट घेऊन आपली करुण कहानी जगनमोहन यांना सांगितली होती. त्यावेळी, रेड्डी यांनी या आशा वर्कर्संना वेतनवाढीचे आश्वासन दिले होते, ते आज पूर्ण केले आहे.
 
 
 
ताडेपल्ली येथील या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांसाठीच्या आरोग्य सुविधांवर भर देण्यात आला आहे. तसेच, आरोग्य विभागात भ्रष्टाचार कदापी सहन केला जाणार नाही, अशी सूचनाही जगनमोहन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. या विभागासंदर्भात 45 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेशही जगनमोहन यांनी दिले आहेत. जगनमोहन रेड्डी यांनी चंद्राबाबूंच्या गडाल उद्धवस्त करत वायएसआर काँग्रेसचे सरकार स्थापन केले आहे.
दरम्यान, जगनमोहन सरकारच्या या निर्णयाचे आशा वर्कर्संने स्वागत केले असून त्यांचे आभारही मानले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा थेट फायदा गोदावरी जिल्ह्यातील 4500 आशा वर्कर्संना मिळणार आहे.