श्रीलंका राष्ट्राध्यक्षांची निवडणूक नोव्हेंबरनंतर

    दिनांक :03-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
कोलंबो,
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या 15 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान होणार आहे. देशाच्या निवडणूक आयोगाचे अध्यक्ष महिंदा देशप्रिया यांनी ही घोषणा केली आहे. मावळत्या राष्ट्राध्यक्षांची मुदत संपण्याच्या एक महिनाआधी त्या पदासाठी निवडणूक व्हावी, अशी तरतूद श्रीलंकेच्या राज्यघटनेमध्ये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

 
 
राष्ट्राध्यक्षपदासाठी 7 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी दिल्ली येथे मागील आठवड्यात दिली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी आले असता, त्यांनी ही माहिती दिली होती. सिरिसेना यांची पाच वर्षांची मुदत पुढील वर्षी 8 जानेवारीला संपत आहे.
 
मतदार दिनानिमित्त श्रीलंकेतील मोरातुवा येथे झालेल्या समारंभात निवडणूक आयोगाचे अध्यक्ष मिंहदा देशप्रिया म्हणाले की, 10 नोव्हेंबरला रविवार आहे. बौद्धधर्मीयांसाठी पवित्र असलेला पोया दिन 12 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक 15 नोव्हेंबरलाही होऊ शकते. ही निवडणूक 7 डिसेंबरच्या आत घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
 
दरम्यान, आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढविणार की नाही, हे अद्याप सिरिसेना यांनी स्पष्ट केलेले नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात सिरिसेना यांनी विक‘मिंसघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून तिथे राजपक्षे यांची वर्णी लावली होती. त्यामुळे त्या देशात सुमारे 50 दिवस घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सिरिसेना यांचा निर्णय घटनाबाह्य ठरवून, विक‘मिंसघे यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान केले.