अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यात इसिसच्या केरळ मॉड्युलचा म्होरक्या ठार

    दिनांक :03-Jun-2019
काबूल,
इसिस या दहशतवादी संघटनेचा केरळ मॉड्युलचा म्होरक्या राशीद अब्दुल्ला महिनाभरापूर्वी अफगाणिस्तानात ठार झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या खोरासन प्रांतातून इसिसच्या एका अज्ञात दहशतवाद्याने टेलिग्राम ॲपच्या माध्यमातून पाठवलेल्या संदेशात ही माहिती दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या बॉम्बहल्ल्यात राशीद अब्दुल्लाचा खात्मा झाला. या हल्ल्यामध्ये तीन भारतीय पुरुष, दोन महिला आणि चार लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे या दहशतवाद्याने संदेशात म्हटले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. 
 
 
इसिस विचारधारेचा प्रसार करण्यासाठी राशीद अब्दुल्ला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सकि‘य होता. केरळच्या कासारगोड जिल्ह्यात रहाणार्‍या राशीद अब्दुल्लाच्या टेलिग‘ाम अकाऊंट मागील दोन महिन्यांपासून अपडेट नव्हते. त्यामुळे त्याचे काय झाले याची विचारणा करण्यासाठी संदेश पाठवला. त्यावर तो आता जिवंत नसल्याचे उत्तर मिळाले. ही माहिती देणार्‍या इसिसच्या दहशतवाद्याने स्वत:ची ओळख सांगितलेली नाही.
 
केरळमधून मे ते जून 2016 दरम्यान 21 जण इसिसमध्ये सहभागी झाले होते. अफगाणिस्तानातील इसिसचे वर्चस्व असलेल्या भागात हे सर्वजण गेले होते. राशीद अब्दुल्ला या 21 जणांचा नेता होता. अब्दुल्लासोबत त्याची पत्नी आयेशासुद्धा गेली होती. भारतातून संयुक्त अरब अमिरात येथे व तेथून तेहरानमार्गे हे सर्वजण अफगाणिस्तानात पोहोचले होते. पीस इंटरनॅशनल शाळेचा कर्मचारी असणारा अब्दुल्ला 2014 साली इसिसकडे आकर्षित झाला.
 
अब्दुल्ला अभियंता होता. संकेतस्थळांवर उपलब्ध असलेल्या इसिसच्या प्रचाराच्या साहित्याने तो प्रभावित झाला, असे त्याच्यासोबत काम करणार्‍या सहकार्‍यांनी सांगितले. अफगाणिस्तानात गेल्यानंतर केरळमधील तरुणाईला इसिसकडे ओढण्यासाठी तिथून तो ऑडिओ क्लिप्स पाठवायचा. टेलिग्राम ॲपवरील विविध अकाऊंटवरून त्याने 90 पेक्षा जास्त ऑडिओ क्लिप्स पाठवल्या होत्या. शाजीर अब्दुल्ला ठार झाल्यानंतर तो केरळ मॉड्युलचे नेता बनला होता. शाजीर अब्दुल्लासुद्धा केरळच्या कोझीकोडेमधील अभियांत्रिकीचा पदवीधर होता.