एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल उद्या होणार जाहीर

    दिनांक :03-Jun-2019
तभा ऑनलाईन टीम 
पुणे,
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र ,कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी- सीईटी परीक्षेचा निकाल उद्या मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रसिध्द केला जाणार आहे. एमएचटी- सीईटीच्या अधिकृत स्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. निकालामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा सर्व विषयाचा पर्सेंटाईल स्कोअर आणि पीसीएम आणि पीसीबी ग्रुपचा स्कोअर स्वतंत्रपणे दिला जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

 
 
राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 3 लाख 92 हजार 304 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले.मागील वर्षी ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेस 4 लाख 35 हजार 606 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 4 लाख 19 हजार 408 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
 
ऑनलाईन पध्दतीने जाहीर केल्या जाणा-या निकालावर विद्यार्थ्याचे नाव,त्याच्या पालकाचे नाव,आईचे नाव यांचा उल्लेख केला जाईल.तसेच निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे.त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाऊनलोड करून घेतला,याबाबतची माहितीही दिली जाईल,असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.