मुलाचे पत्र वाचले म्हणून दोन वर्षांचा कारावास!

    दिनांक :03-Jun-2019
- 2.33 लाख दंडही ठोठावला 
 
 
तभा ऑनलाईन टीम  
सेव्हिले,
स्पेनमधील एका व्यक्तीला त्याच्या दहा वर्षांच्या मुलाचे पत्र वाचणे चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीला मुलाचे पत्र वाचण्याच्या गुन्ह्यासाठी 2.33 लाख रूपये दंड आणि दोन वर्षांचा तुरूंगवास ठोठावण्यात आला आहे.
सेव्हिले शहरातील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वडिलाने त्याच्या मुलाच्या खाजगीपणाचे उल्लंघन केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. या वडिलांनी मुलाच्या नावाने आलेले पत्र उघडले. वास्तविक पाहता, त्यांना ते पत्र उघडण्याचा आणि वाचण्याचा अधिकार नव्हता, असे न्यायालयाने म्हटले आहे.
 
हे पत्र मुलाला त्याच्या मावशीने लिहिले होते. या पत्रात लिहिले होते की, वडिलांनी त्याच्या आईला वाईट वागणूक दिली होती आणि मुलगा कशाप्रकारे वडिलांचा गुन्हा सिद्ध करू शकतो. वडिलांनी न्यायालयात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की, मुलाची मावशी त्याच्यावर जबाब देण्यासाठी दबाव टाकत आहे.
 
 
मुलाच्या आईने 2012 मध्ये त्याच्या वडिलांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी खटला दाखल केला होता. तिने पतीवर खाजगी माहिती सार्वजनिक केल्याचा आरोप लावला होता.
 
पत्र वाचल्याचे पुढे आल्यावर मुलाच्या मावशीने न्यायालयाकडे दोन वर्षांची शिक्षा आणि दोन लाख 33 हजार रुपयांच्या दंडाची मागणी केली होती. तसेच वकिलांनी अतिरिक्त दंडाचीही मागणी केली होती. मुलाच्या वडिलाने स्वत:च्या बचावासाठी म्हटले की, ते पत्र मी चुकीने उघडले होते. तसेच, त्यात लिहिलेल्या गोष्टी सर्वात आधी मुलाला सांगितल्या होत्या. मात्र, न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावला.