अमरनाथ यात्रेसाठी एक लाख भाविकांनी केली नोंदणी

    दिनांक :03-Jun-2019
जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला रविवार एक जुलैपासून सुरूवात होणार आहे. ४६ दिवस चालणारी ही यात्रा १५ ऑगस्ट रोजी संपणार आहे. यासाठी आतापर्यंत तब्बल एक लाख १० हजार भाविकांनी नोंदणी केली आहे. भाविकांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात गेल्या आठवड्यात राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते करण्यात आली होती.
 
 
तीन हजार ८८० मीटर उंचीवर स्थित असणा-या अमरनाथची यात्रा जवळपास महिन्याभरापेक्षा जास्त काळ सुरु राहते. अमरनाथच्‍या दर्शनासाठी जाणारे भाविक अनंतनाग जिल्‍ह्याच्‍या परंपरागत २८.२ किमी लांब पहलगाम मार्ग आणि गंदेरबल जिल्‍ह्याच्‍या ९.५ किमी लांब बालटाल मार्गावरुन जातात.
चंदनवाडी मार्गांद्वारे जाणाऱ्या वार्षिक अमरनाथ यात्रेची नोंदणी दोन एप्रिलपासून सुरू झाली आहे. विशिष्ट दिवसाचे व मार्गाचा परवाना तपासणी आणि वैद्यकीय प्रमाणपत्र तपासून घेतल्यानंतरच भाविकाला अमरनाथ यात्रेत सहभागी होता येईल. त्यासाठी पंजाब नॅशनल बँक, जम्मू-काश्मीर बँक, एस बँकेच्या ३२ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४४० शाखांमध्ये सोय करण्यात आली आहे. ४६ दिवसांच्या अमरनाथ यात्रेत १३ वर्षांखालील मुले, ७५ वर्षांवरील व्यक्ती आणि सहा आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीच्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही.