पन्नाशीनंतरचं अर्थनियोजन

    दिनांक :03-Jun-2019
जीवानाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण आपल्या आर्थिक क्षमतेचा आढावा घेत असतो. काही गणितं नव्याने जुळवतो तर काही खर्चांना कात्री लावतो. कमावत्या महिलांनीही आर्थिक नियोजनाचा विचार गांभीर्याने करणं गरजेचं आहे. भविष्याच्या दृष्टीने त्यांनी गुंतवणूक, बचत करायला हवी. पन्नाशीच्या महिलांनी आपल्या आधीच्या गुंतवणुकींचा आढावा घ्यायला हवा. कुठल्या गुंतवणुकीने चांगला परतावा दिला, कुठे चूक झाली या सर्वांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. या निमित्ताने आपल्याला आर्थिक उद्दिष्टांवर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळते. पन्नाशीच्या टप्प्यावर महिलांनी नेमकं काय करायला हवं याविषयी... 

 
 
वयाच्या या टप्प्यावर कर्जाचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा. आधीची सगळी कर्ज फेडून कर्जमुक्त आयुष्य जगण्याकडे वाटचाल करायला हवी. गृहकर्ज, वाहनकर्जाची लवकरात लवकर परतफेड करावी तसंच क्रेडिट कार्डची बिलं वेळेत भरून टाकावी. वयाच्या या टप्प्यानंतर आर्थिक स्थैर्य आलेलं असतं. धावपळही कमी झालेली असते. त्यामुळे आपल्या बचतीच्या पैशातून कर्ज फेडत राहण्याला काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे पन्नाशीआधीच सर्व कर्ज फेडण्याचा प्रयत्न करावा.
 
पन्नाशीला पोहोचेपर्यंत या आधी केलेल्या गुंतवणुकींचा कालावधी संपायची वेळ आलेली आहेत. तुमच्या हातात एकाच वेळी बराच पैसा येऊ शकतो. अशा वेळी आपल्या या गुंतवणुकींचा आढावा घेऊन गरजेनुसार इतर पर्यायांमध्ये गुंतवणुकीचा विचार करता येईल.
 
पन्नाशीला आलेल्या महिलांनी निवृत्तीसाठी अधिकाधिक गुंतवणूक करायला हवी. यामुळे तुमचा दैनंदिन खर्च भागवताना अडचणी येणार नाहीत. तसंच सध्याची जीवनशैलीही तुम्ही कायम राखू शकता. वैद्यकीय आणि जीवन विम्यासोबतच वेगळा आपत्कालीन निधीही महिलांनी जमवायला हवा. यासाठी वेगळी तरतूद करून ठेवावी.
 
वयाच्या या टप्प्यावर मृत्यूपत्रही करून ठेवायला हवं. यामुळे भविष्यातली भांडणं, वाद, गैरसमज टाळता येतील. मृत्यूपत्र करण्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. पण हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र आहे हे आपण लक्षात घ्यायला हवंं.