रॉबर्ट वाड्राच्या विदेश प्रवासाला कोर्टाची परवानगी

    दिनांक :03-Jun-2019
नवी दिल्ली:
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले रॉबर्ट वाड्रा यांना दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयानं दिलासा दिला आहे. वैद्यकीय उपचारांकरिता सहा आठवड्यांसाठी विदेशात जाण्यास त्यांना न्यायालयानं परवानगी दिली आहे.

 
वाड्रा यांना न्यायालयानं उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडला जाण्याची परवानगी दिली आहे. सहा आठवड्यांसाठी त्यांना विदेशात जाता येणार आहे. आता ते विदेशवारीचं वेळापत्रक न्यायालयात सादर करतील. दुसरीकडे ईडीनं त्यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलावलं आहे. लंडनमध्ये वाड्रांची मालमत्ता आहे. त्यामुळं ईडीनं गेल्या सुनावणीवेळी त्यांना लंडनमध्ये जाण्यास विरोध केला होता. त्यांना लंडनलाच का जायचं आहे, असा प्रश्न ईडीनं उपस्थित केला होता. त्यावर तिथेच योग्य उपचार मिळतील, अन्यथा तुम्ही ठिकाण सांगा, तिथे जाईल असं वाड्रा म्हणाले होते. अमेरिका आणि नेदरलँड असे पर्यायही वाड्रांनी दिले होते. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं त्यांना उपचारासाठी या दोन्ही देशांत जाण्याची परवानगी दिली आहे.
तत्पूर्वी, विदेशात जाण्यासाठी परवानगी मागणाऱ्या वाड्रांच्या याचिकेवरील निकाल न्यायालयानं तीन जूनपर्यंत राखून ठेवला होता. आजाराचं कारण देत उपचारांसाठी लंडन किंवा इतर देशांत जाण्याची परवानगी वाड्रांनी मागितली होती. त्याला ईडीनं विरोध दर्शवला होता.