दिल्लीत महिलांना मेट्रो, बस प्रवास मोफत

    दिनांक :03-Jun-2019
दिल्ली सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली,
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे. दिल्लीत मेट्रो आणि बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होत असून, त्याच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिलांनामेट्रो व बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत महिलांना असुरक्षित वाटते. महिलांच्या सुरक्षेतेसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने दिल्ली मेट्रो आणि डीटीसी बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महिलांच्या मोफत प्रवासामुळे डीएमआरसीचे होणारे नुकसान दिल्ली सरकार भरुन काढेल, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
याचबरोबर, येत्या दोन ते तीन महिन्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय, दिल्लीतील सक्षम महिला, त्यांना वाटल्यास तिकिट काढू शकतात. मात्र, त्यांना सब्सिडीचा वापर न करण्यासाठी प्रेरित करण्यात येईल, असेही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. त्यामुळे केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज आहे की, असे विचारले असता अरविंद केजरीवाल म्हणाले, यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेण्याची गरज नाही. दिल्ली सरकार सब्सिडी देत असून याचा खर्च सुद्धा दिल्ली सरकार देणार आहे.
 
 
 
दरम्यान, दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले होते की, दिल्लीचे वाहतूकमंत्री कैलाश गेहलोत यांनी या योजनेचा सर्व बाजूंनी विचार करण्यासाठी बैठकीच्या अनेक फे-या पूर्ण केलेल्या आहेत.
 
 
 
बसमध्ये मोफत प्रवास योजना लागू करणे अवघड नाही; परंतु मेट्रोमध्ये अशी योजना आणणे आव्हानात्मक काम आहे. कारण मेट्रोमध्ये दिल्ली सरकार व केंद्राचा ५०-५० टक्के वाटा आहे. आधीच मेट्रोबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये भाडेवाढ, चौथ्या टप्प्याचे काम अशा अनेक मुद्यांवर मतभेद आहेत. त्यात पुन्हा या वादाची भर पडणार आहे. त्यामुळे तांत्रिक व आर्थिक मुद्यांवर मेट्रोमध्ये महिलांना मोफत प्रवास देणे सोपे दिसत नाही, असेही हा अधिकारी म्हणाला होता.