#ICCWorldCup2019 : द रोज बाऊलमध्ये भारत खेळणार पहिला सामना

    दिनांक :03-Jun-2019
नवी दिल्ली,
भारतीय संघ 5 जून रोजी आपल्या विश्वचषक अभियानाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध करणार आहे. हा सामना साऊदम्पटनच्या द रोज बाऊल स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. हा भारत आणि दक्षिण आफ्रिकादरम्यान या मैदानावरील पहिला सामना होईल. विशेष म्हणजे या मैदानावर दोन्ही संघांनी आतापर्यंत 3-3 सामने खेळलेले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या विश्वचषकात पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे, तर फाफ डु प्लेसिसचा संघ आपला तिसरा सामना खेळणार आहे. त्यांना यजमान इंग्लंड व बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला आहे. 

 
 
पहिल्यांदाच विश्वचषक सामना
द रोज बाऊल स्टेडियमची स्थापना 2001 साली झाली. हे इंग्लिश काऊंटी क्रिकेट क्लब हॅम्पशायरचे घरचे मैदान आहे. हे नवीन मैदान असून येथे पहिल्यांदाच विश्वचषकाचा सामना खेळला जाणार आहे. यापूर्वी या मैदानावर कोणताही विश्वचषक सामना खेळला गेला नव्हता, परंतु यावेळी येथे एकूण 5 सामने खेळले जाणार आहे. या स्टेडियममध्ये एकूण 15,000 प्रेक्षक बसण्याची व्यवस्था आहे.
 
या स्टेडियममध्ये भारताला दोन सामने दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 5 जून रोजी, तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना 22 जून रोजी होणार आहे.
 
भारताचे प्रदर्शन
या मैदानावर भारताने एकूण 3 सामने खेळले असून यापैकी एक सामना जिंकला आहे. भारताला केनियाविरुद्ध 11 सप्टेंबर 2004 रोजी विजय मिळाला होता, तर त्यानंतरचे दोन सामने गमवावे लागले. भारताने हे दोन्ही सामने यजमान इंग्लंडविरुद्ध 2007 व 2011 मध्ये खेळले होते.
 
दक्षिण आफ्रिकेचे प्रदर्शन
दक्षिण आफ्रिकेनेही या स्टेडियमवर तीन सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे प्रदशन भारतापेक्षा सरस राहिले. त्यांनी 2003 मध्ये झिम्बाब्वे व 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध विजय नोंदविला होता. 2017 मध्ये तिसर्‍या सामन्यात मात्र त्यांना यजमान इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
 
मोठ्या धावसंख्येची अपेक्षा
द रोज बाऊल स्टेडियममधील फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर धावांचा डोंगर उभा होऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे. 2017 साली येथे सर्वात कमी धावसंख्या 288 इतकी नोंदविली गेली, तर सर्वाधिक धावसंख्या 3 बाद 373 इतकी नोंदविली गेली आहे. ही धावसंख्या गत महिन्यात 11 मे रोजी पाकिस्तानविरुद्ध इंग्लंडने नोंदविली होती. प्रत्युत्तरात पाक संघानेसुद्धा 7 बाद 361 धावा काढल्या होत्या. यावरून अंदाज बांधू शकता की, जो संघ प्रथम फलंदाजी करेल, त्यांचा प्रयत्न 350 पेक्षा अधिक धावा काढण्याचा राहील.