मौसम किरकेटचा...

    दिनांक :03-Jun-2019
मौेके पे चौका!
- कौतिकराव
 
म्या कालच सांगलं का किरकेट ह्या अत्यंत म्हनजे लयच चांगला खेल हाय. आता किरकेटचा मौसम हाय, असं म्हनतेत. थो कई नसते, असं माहवालं इचारनं हाय. जगात कुठीना कुठी किरकेट खेलतच रायतेत लोक. आता आयपीएल झालं न आता वर्ल्ड कप आलं. थे झालं का मंग संपलं असं नाही होत. कोंचातबी देस कोंच्यातबी देसाच्या दौर्‍यावर जानारच. भारताच्या टीमचाबी वर्ल्ड कपच्या बाद दौर ठरेलच हाय. अती किरकेट पायी खेलाडू जखमी होतेत. थकतेत. घरापासून दूर रायतेत. म्हून मंग आता खेलाडू म्हनतेत का, आमाले आमच्या बायका संग नेऊ द्या... आता हे मागनी खेलाडूची हाय का त्यायच्या बायकायची, हे समजाले मार्ग नाही. 
 
 
म्या म्हनलं का जगात कुठीना कुठी किरकेटचा खेल सुरूच असते. मॅचेस रायतेतच... थे काही बराबर नाही. जे देश साहेबायचे गुलाम होते तठीच किरकेट खेलला जाते. जगांत आता सोया का अठराच देस किरकेट खेलतेत अन्‌ थे सारेच इंग्रजायचे गुलाम होते कईतबी. त्यायच्यापायी इंग्लीस (भाषा बरं का!) अन्‌ किरकेट या देसात हाय. बाकी जगात पयल्या नंबराकडं जानारे कामकरी देस किरकेट खेलत नाही. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, चीन, जपान, रशिया, कोरीया... असे काही उदाहरनं देता येतीन. कारन या देशावर इंग्रजायचं राज कईच नोतं अन्‌ आता असन्याचं काही कारन नाही...
 
हे पण वाचा...  
 
आमी इंग्रजायच्या बाकी सार्‍या खुना पुसून काढन्यात स्वाभिमान समजतो अन्‌ अभिमानानं किरकेट खेलतो. आलंपिक मंध किरकेट नाही. तिकडं आमी चार-दोन सुवर्न पदकाच्या वर कई तान मारत नाही. दहा- बारा देसात मात्र आम्ही किरकेटमंध कईकई जितत असतो. फुटबॉल सारं जगच खेलते अन्‌ त्याच्यात आमचा नंबर दीडशेच्या वर रायते. फुटबॉलच्या वर्ल्ड कप खेलन्यासाठी आमची टीम क्वॉलिफायबी करत नाही. तरीबी आमी किरकेट खेलतो. कारन का त याच्यात ‘मले कोन वानवे त मीच वानवे’ (हातपाय पाहिले त मेंडकुळीवाने) असं करता येते.
 
किरकेट समोर बाकी खेल म्हंजे अमिताभ समोर मुकरीवानी झाले हायत. तरीबी आमी किरकेटले धर्मच मानतो. कारन ह्या चकाचकाट पयस्याचा खेल हाय... त्याचा अल्लगच जांगळबुत्ता हाय, थो कसा? थे सांगतो ना अल्लादीच, काहून का आपल्याले आता वर्ल्ड कप संपेवरी बोलतच राहाच हाय ना!