रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताचा रशियाशी २०० कोटींचा करार

    दिनांक :30-Jun-2019
नवी दिल्ली,
भारताने रशियासोबत एक महत्वाचा करार केला आहे. रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रासाठी भारताने रशियासोबत २०० कोटी रुपयांचा करार केला आहे. त्यानुसार, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी आपल्या एमआय-३५ या लढाऊ हेलिकॉप्टरसाठी रशियाकडून ही रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रे (स्ट्रम अटाका) खरेदी केली जाणार आहेत. १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्लानंतर सरकारकडून तिन्ही सैन्य दालांना आपत्कालीन अधिकार देण्यात आले होते. यानुसार, तिन्ही सैन्य दले आपल्या गरजेनुसार ३०० कोटी रुपयांची शस्त्रास्त्रे तत्काळ प्रभावाने खरेदी करु शकतात.
 
भारताकडून याच आपत्कालीन नियमांचा वापर करुन रशियासोबत स्ट्रम अटाका क्षेपणास्त्रांचा करार करण्यात आला आहे. भारताला येत्या तीन महिन्यांत या क्षेपणास्त्रांचा पुरवठा सुरु होणार आहे. स्ट्रम अटाका हे क्षेपणास्त्र एसआय-३५ हेलिकॉप्टरमध्ये लावल्यानंतर शत्रूचे रणगाडे आणि इतर शस्त्रांपासून वाचण्याची क्षमता वाढणार आहे. एमआय-३५ भारतीय हवाई दलाचे थेट हल्ला करणारे हेलिकॉप्टर आहे. भारत अनेक काळापासून रशियाकडून क्षेपणास्त्र खरेदी करण्यास उस्तुक होता. मात्र, या कराराद्वारे तब्बल एक दशकानंतर भारताची इच्छा पूर्ण झाली आहे.
 
 
गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी तीन संरक्षण आपत्कालीन तरतुदींनुसार तिन्ही सैन्य दलांकडून होणाऱ्या खरेदीबाबत एक प्रेझेंटेशन दिले होते. यामध्ये आपत्कालीन तरतुदींचा वापर करुन शस्त्रास्त्रे खरेदीमध्ये हवाई दल पुढे राहिले आहे. याच तरतुदीनुसार, लष्करही २००० स्टँड ऑफ वेपन सिस्टिमसोबत अनेक स्पेअर पार्ट आणि हवेतून हवेत मारा करण्याच्या क्षेपणास्त्रांचा करार अनेक देशांसोबत करुन स्वतःला कोणत्याही युद्धासाठी सज्ज ठेवणार आहे. त्याचबरोबर भारत रशियाकडून इंग्ला-एस एअर डिफेन्स क्षेपणास्त्रही तत्काळ खरेदी करणार आहे.