कतारमध्ये अमेरिकेची शक्तिशाली एफ-22 विमाने तैनात

    दिनांक :30-Jun-2019
दोहा,
इराणसोबत मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झालेला असताना अमेरिकेने कतारमध्ये पहिल्यांदाच एफ-22 स्टेल्थ लढाऊ विमाने तैनात केली आहेत. अमेरिकन सैन्य आणि हिताच्या रक्षणासाठी एफ-22 स्टेल्थ विमाने तैनात केल्याचे अमेरिकी वायुदलाच्या केंद्रीय लष्करी कमांडकडून सांगण्यात आले आहे. 

 
एफ-22 ची नेमकी किती विमाने तैनात केली ते स्पष्ट केलेले नाही. कतारच्या तळावरून पाच एफ-22 विमानांनी उड्डाण केल्याचे समजते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण बरोबरच्या अणू करारातून माघार घेऊन आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला.
 
मागच्या आठवड्यात इराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडल्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेने प्रतिहल्ल्याची तयारी सुद्धा केली होती. त्यासाठी इराणमधील लक्ष्यदेखील निश्चित केले होते. पण, शेवटच्या काही मिनिटांमध्ये ट्रम्प यांनी आपला निर्णय बदलला. एक मानवरहित ड्रोन पाडण्याच्या बदल्यात अनेक लोकांचा प्राण घेणे आपल्याला योग्य वाटले नाही, असे ट्रम्प यांनी आपल्या माघारीच्या निर्णयावर सांगितले.