युवराज तुम्ही सुद्धा...

    दिनांक :30-Jun-2019
एक आटपाट नगर होतं... आता कुठल्याही गोष्टीची सुरुवात अशीच असते. ‘नगर होतं’ म्हणजे आता नाही, गोष्टीतलं हे नगर आता का नसतं? म्हणजे गोष्ट तेव्हाच होते जेव्हा ती भूतकाळात जमा होते. त्याला काही भविष्य असत नाही. ज्याला भविष्य नसतं त्याला वर्तमानही नसतंच... अन्‌ असले तरीही तो वांझोटा असतो. आहे म्हणून आहे. संपला नाही म्हणून आहे. म्हणजे कसं की एखादा खेळाडू संघात असतो पण बारावा असतो. तो मैदानावर कधीच येऊ शकत नाही... तर या आटपाट नगराची कहाणी अगदी 23 मे 2029 पर्यंत होती. म्हणजे काहीतरी आशा होती. आपल्या वर्‍हाडी भाषेत ज्याला धुगधुगी होती असे म्हणता येईल. आता मात्र हे नगर ‘होतं’ या सदरात जमा झालं आहे. खरंतर तसे होण्याची काही गरजच नव्हती; पराभव काय, येतच असतात. विजेत्याच्या गळ्यात फुलमाळा अन्‌ सगळ्यांनाच लागतो त्याचाच लळा. बदलत असतात ना प्रत्येकाच्या वेळा... आता तेही कधीकाळी दोन होते. दोनाचे तीनशे झाले अन्‌ आता ते अबकी बार चारसौ पार, असा नारा देणार आहेत. त्यांची तशी तयारी सुरू आहे. हे आटपाट नगरचे राजपुत्र मात्र शेंदाड शिपाईच निघाले. हे जन्माला आले तेव्हा आमीर खानचा पहिला चित्रपट आला असावा. त्यात ते गाणे होते, पापा कहतें है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा... या युवराजांच्या वडिलांनीही हेच गाणे म्हटले असावे; पण थोडे उलट झाले. ‘बेटा हमारा सौ के साठ करेगा’ असे म्हटले असावे चुकून यांच्या वडिलांनी. म्हणून की काय यांच्या वडिलांनी 400 चा आकडा पार केला होता. यांनी त्याचे चाळीस केले...आटपाट नगरच्या या युवराजाची कथाच मोठी न्यारी आहे. लोक म्हणतात त्यांना, ही केस भारी आहे. लोक म्हणजे त्यांचेच लोक म्हणतात की ही केस भारी आहे. म्हणून मायनं किती आट काढला; पण यांचा पाट (ता. क.- पाट लागणे याचा अर्थ लग्न होणे... ‘सुज्ञ’ वाचकांसाठी सांगून ठेवावे लागते) काही लागला नाही. सहसा असं म्हणतात की पाट लागला की वाट लागते... यांचा पाटही लागला नाही अन्‌ तरीही यांची वाट लागली. उलट यांची लोकशाहीतही वशंपरंपरेने टिकून असलेली गादी ज्यांनी मिळवली त्यांचा पाट लागला अन्‌ त्यांना वाट गवसली अन्‌ ते आता देशाला जागतिक महासत्तेच्या वाटेवर नेत आहेत. आटपाट नगरच्या या कथित युवराजांनी त्यांच्याकडे तब्बल पंधरा वर्षे राजगादी असतानाही लोकांच्या अपेक्षांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या. त्यामुळे लोकांची हाय लागली असावी आणि म्हणून यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या नाहीत... तेही एकदाचे बरेच झाले. नाहीतर देशाच्या वहिनी पडल्या असत्या निवडणुकीत, मग त्यांचेही मत यांना पडले नसते. मग यांचा चेहरा आता पडला आहे त्यापेक्षाही घनफुटाने पडला असता.
एकुणात काय की पडझड सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत ती थांबेल, असे वाटत होते, मात्र आता यांची अवस्था ना जात्यात ना सुपात, आहेत दाणे अन्‌ तरीही म्हणतात ‘म्हण गाणे’, अशी झालेली आहे. म्हणून युवराज ‘बौखला गये है’. (आता कुणी हे मराठीत का नाही म्हणत? मराठीत काय याला चांगले शब्द नाहीत का तुमच्याकडे, असे विचारू शकतो. असे विचारताना चार आंग्ल शब्द त्यात वापरू शकतो, पण सांगून ठेवतो की युवराजांच्या या अवस्थेला ‘बौखला गये हो ठाकूर’, या पलीकडे योग्य भाषा नाही आमच्याकडे) त्यामुळे त्यांनी निवडणुकीचे निकाल लागताच आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामाच देऊन टाकला. नुसता नाही देल्ला ना जी, एकदम ट्रिपल तलाक टाईपचा राजीनामा देल्ला! म्हणजे आता पक्षाचा युवराजावर कुठलाही उजर राहिला नाही. तीन वेळ त्यांनी ‘राजीनामा, राजीनामा, राजीनामा’ असे म्हटले आहे. त्यानंतरही पक्ष त्यांच्याच नेतृत्वात नांदायला तयार होता. तरीही युवराज नाही म्हणाले. नाहीवर ठाम राहिले. आपल्या कुठल्यातरी भूमिकेवर ठाम राहण्याची त्यांच्या कारकीर्दीतली ही पहिलीच वेळ. ‘नो मीन्स नो!’ आता त्यांच्या या ऐतिहासिक पक्षाला इतिहासात जमा होण्याची वेळ आली की हो! आधीच दुसर्‍यांदा दणक्यात पराभवाने पक्ष पार हुळहुळा झाला होता, त्यात युवराजही पक्षाचे कासरे सोडून पळतो म्हणतात. आता म्हैस दुभती असेल तर कुणीही गोठ्यात बांधील की, एकतर म्हैस भाकड, त्यातही म्हैस, त्यामुळे गोशाळेतही थारा नाही. त्यामुळे तिचं करायचं कुणी असा सवाल आहे. आता पक्षातल्या लोकांची अवस्था अंगावर एकही कपडा नाही अन्‌ न्हाणीघराच्या भिंतीत पडल्यासारखी झाली आहे. आता हिंदीत म्हण आहे की ‘हमाम मे सब... होते है’ हे नग्न सत्य आहे, पण ‘होते है, लेकीन सबको दिखते नही ना...’ आतावर हे तसेच होते; यांचं राजकारण हमाम मधलंच... पण दिसले नव्हते. आता पार उघडे पडले आहेत.
आता अशी अवस्था आली ना की मग सल्ले देणारे खूप येतात. कुणी स्वत:ला गुदगुल्या करणारी हळहळ व्यक्त करायला येतात तर कुणी माझं रडू की तुला सांभाळू, अशा अवस्थेत असतात. यांचे व्याही मराठी काकांचं तसंच आहे. रडता येईना धरण कोरडं, अशी त्यांची गत. त्यामुळे ते सांत्वनेलाही जाऊ शकत नाहीत. नाहीतरी युवराज कधी नव्हे ते काकांना भेटून गेले. पुन्हा एक होऊ म्हणाले. कदाचित काकांनाही ते पटले असावे. आता काकांच्या राजकीय आयुष्याचे मेंडेटरी ओव्हर्स सुरू झाले आहेत. त्यांचा पॉवर प्ले कधीचाच संपला आहे अन्‌ आता ते थर्ड अंपायरकडे अपीलही करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्याही पक्षात दादागिरी सुरू झाली आहे. ना ‘तू’ निवडून येत अन्‌ नातूही निवडून आणू शकत नाही, अशी अवस्था या मराठी काकांची झाली आहे. त्यामुळे त्यांच्या उरल्यासुरल्या पक्षवाले म्हणाले, ‘विलिनीकरण वगैरे काही नाही’. बरं हे विलिनीकरणही कशासाठी? तर विरोधीपक्ष नेतेपद मिळावे म्हणून. म्हणजे राम गणेश गडकरी म्हणतात तसेच झाले आहे, ‘ज्या हातांनी मोती पाखडले सुपात त्या हातांना जोंधळेही मिळू नयेत?’ त्यामुळे आता हेही गेले अन्‌ तेही गेले, फुकटचे धुपाटणे आले, अशी अवस्था झालेली आहे. जनतेला नाही मारली मिठी म्हणून हातची गेली अमेठी... आता पूर्वी जे समोर येऊन बोलूही शकत नव्हते तेही सल्ले द्यायला लागले आहेत. लोकांचे असेच असते. फॅक्ट्री बंद पडली अन्‌ उद्या अंबानीही रस्त्यावर आलेत ना तर त्यांचा चपराशीही त्यांना सांगेल, साहेब फॅक्ट्री ऐसे चलातें है... तसेच आता या युवराज बाबांचे झाले आहे. पक्षाच्या भरोशावर जे जमून बसले अन्‌ या निवडणुकीत जे बाहेरही नाही पडले तेही आता युवराजांनी काय काय करायला हवे होते, हे सांगत आहेत. युवराजांनी राजीनामा न देता त्यांनी देशाचा दौरा करायला हवा होता. लोकांचे आभार मानायला हवे होते... हे आमचे युवराज तर अमेठीतही नाही गेले... असे त्यांच्याच पक्षाचा नगरसेवकही न झालेला कार्यकर्ता म्हणत होता. आता त्याच्या म्हणण्यात दम होता. हार के बादही जीत होती है... पण म्हणून काय इतकी दर्दनाक हार? दोन दोन वेळा? पण एक आहे ना, इतक्या वेळा तुम्ही जिंकतंच आला होतात. हारता असे वाटत असतानाही जिंकलाच अनेकवेळा. आता हरलात. तुमची आजीही हरली होती ना... उतला, मातला की त्याला जनतेने मातीत घातला, हेच सत्य आहे; पण तुमची आजी परत आलीच ना... पुन्हा जिंकलीच ना. मग युवराज तुम्ही सुद्धा...