बाप नावाचा पारिजातक!

    दिनांक :30-Jun-2019
अभिषेक देशपांडे
 
आजकाल जगात वेगवेगळे दिवस (डे) साजरे करण्याचं एक फॅड आलेलं आहे. त्यातले काही दिवस बरे जरी असले, तरी ते नुसते साजरे करून काहीच उपयोग नाही. त्या दिवसाची उपयोगिता लक्षात घेऊन, मुळात तो दिवस साजरा करताना त्या विषयीची आदरयुक्त भावना मनात असणे गरजेचे आहे. नाहीतर मदर्स डे साजरा करायचा आणि वृद्धाश्रमात आईला भेटायला जायचं, असला प्रकार नको.
 
दरवर्षी जून महिन्यातील तिसर्‍या रविवारी येणार्‍या ‘फादर्स डे’चा विचार करीत बसलो होतो आणि मन भरून आलं. विचारांची डोक्यात गर्दी व्हायला लागली आणि त्या गर्दीत हा ‘बाप दिवस’ आला नि गेलाही... बाप मात्र अवघे अस्तित्व भारून कायम आहे, राहणार आहे.
 
 
 
‘बालपणापासून पाठीशी खंबीरपणे उभे असलेलं पहाडी कवच म्हणजे बाप!’ अशा संकल्पनेनं मनाची पकड घेतली आणि भावनिक शब्दांकन कागदावर उतरायला लागलं. एखाद्या पत्रासारखी रचना सुरू झाली. जणू बाबांची आठवण प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती. पहिला विचार मनात आला तो म्हणजे बाबांना आठवण्याकरीता खरंच कुठल्या फादर्स डेची गरज आहे का? आजच्या या विज्ञानयुगात म्हणे प्रत्येक गोष्टीची डेफिनेशन असावी लागते. मग मीपण ‘बापाची’ व्याख्या शोधायला लागलो. कागदावर मनातील विचारांची झालेली गर्दी आणि गुंतागुंत बघून माझंच मला कंट्रोेल करणं गरजेचं वाटू लागलं. पण, त्या विचारांच्या त्सुनामीनंतर एक परिपूर्ण अशी व्याख्या तयार करता आली ती अशी-
 
‘भावना व्यक्त न करू शकणारी आई म्हणजे बाबा...’ ते आजचे डॅड... जन्म देणारी जशी आई तसेच जन्म सार्थकी लागावा यासाठी आयुष्यभर झगडणारा तो बाबा... आईच्या मऊशार तळव्यामागचा तो राकट हात म्हणजे बाबा... पोरांनी कितीही आपलं घरटं सोडून नवी क्षितिजे गवसण्याचा प्रयत्न केला, तरी बाप मात्र त्या घरट्याचा पाया मजबूत ठेवून मायेचं छत्र कायम ठेवत असतो. आपली अपूर्ण स्वप्नं आपल्या पोरांमध्ये बघून ती पूर्णत्वास नेताना कुठलीही अपेक्षा न ठेवता सतत त्यांच्या यशाची कामना करणारा आणि खचलेल्या मनाला उभारी देणारा मदतीचा हात म्हणजेच बाबा... अण्णा... पप्पा... आणि डॅड... कोणत्याही निर्णायक क्षणी आश्वासक असणारं श्रद्धास्थान म्हणजे बाबा!
 
आई माया लावते तर बाप शिस्त लावतो, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मला आता कळतंय, बाबांनी घेतलेला माझा तो अभ्यास, ती तर्खडकरची तीन भाषांतरे आणि पाठ न झालेल्या 29 च्या पाढ्यासाठी कान पिळून केलेली ती शिक्षा माझ्या करीअरच्या दृष्टीनं किती महत्त्वाची होती ते! रात्री उठून आपल्या मुलाच्या अंगावर चादर आहे की नाही, हे बघताना जणू एका सुरक्षेचा ऑराच तयार करणार्‍या बाबांची किमयाच न्यारी... मनाने कितीही कणखर असला, तरीपण पोरगी लग्न होऊन जाते तेव्हा आतून बाप हललेलाच असतो. कारण असं म्हटलं जातं की, पोरगी ही बापाची लाडकी आणि पोरगा आईचा लाडका असतो.
 
शेवटी आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात कोण किती मोठा आहे, हे सांगण्याचा मापदंड बापच असतो. कारण एखाद्या कर्तबगार माणसाला आपण बापमाणूसच म्हणतो ना? मूल जन्माला आल्यावर पहिला शब्द ‘आई’ म्हणायला लागलं की सगळ्यात जास्त आनंद त्या बापालाच होत असतो. पित्यानं सांगितलेली प्रत्येक गोष्ट आपण अंगवळणी पाडत असतो. अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी आणि बुद्धीच्या खेळांमध्ये गोडी निर्माण करताना खिलाडू वृत्तीचे धडेपण बाबांकडूनच मिळाले, हे सांगताना मला अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती आणि अर्थशास्त्राचे बाळकडूपण बाबांकडूनच मिळाले. त्यांच्या निर्णयाचा, विचारांचा परीघ मला कधीही छेदून गेला नाही.
 
बर्‍याचदा शांत राहून त्यांनी आमच्यावर विश्वासच दर्शविला. मलाच काय, कुणालापण आपल्या वडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या स्वप्नपूर्तीची झलक बघून आनंदच होत असणार. एक मात्र अगदी खरंय की, आईच्या मार्फत कितीही बापाशी बोललं, तरी प्रत्यक्ष बापाशी बोलल्याशिवाय जमत नाही. कारण बापाशिवाय काम होत नाही आणि तरीही काही केल्या बाप नावाच्या देवाचा थांगपत्ता लागत नाही!
 
कदाचित माझ्या ‘फादर्स डे’च्या प्रश्नाचं उत्तर मला मिळायला लागलंय. प्रत्येक मुलाचा-मुलीचा रिअल हिरो हा त्यांचा बापच असतो आणि आज ‘अहो बाबां’चा ‘अरे बाबा’ जरी झाला असला, तरी त्यांचा आदर कमी झाला नाही आणि म्हणूनच अशा आदरणीय पारिजातकास नमन करावेसे वाटते... ‘बाप नावाचा पारिजातक!’ हे सत्य समजून घेताना, त्याच्या हळव्या मनाच्या नाजूकपणाला कधीही रक्तबंबाळ होऊ देऊ नका. दुर्दैवाने आज ते घडत आहे. हे थांबले पाहिजे.
 
फादर्स डेने आज माझ्याप्रमाणेच इतरांनाही बापासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे; किंबहुना तशी अनुभूतीसुद्धा कुणाला झाली असेल, पण त्यांना व्यक्त होता आलं नाही हे आपण समजू शकतो. आत्म्यातील ईश्वरी अंश म्हणजे आई. त्यामुळे तिच्याबद्दल बरंच लिहिलं आणि बोललं जातं; पण कुटुंबाचा आधारवड असलेला आणि मुलांवरील संकटांना आपल्या अंगावर घेऊन त्यांना परतवण्याचा प्रयत्न करणारा धैर्यधर बाप, याचा मात्र मुलांना विसर पडतो, हीच शोकांतिका आहे. एक गोष्ट लक्षात असू द्या, ‘बाप नावाच्या पारिजातका’साठी कृतज्ञ होता आले नाही, तर निदान कृतघ्न तरी होऊ नका, यातच या दिवसाच्या साजरीकरणाचं यश आहे.
 
आता पुढच्या वर्षी येणारा फादर्स डे मनात रुंजी घालतो आहे....