सरकार नव्हे, समाज आहे संघाचा आधार!

    दिनांक :30-Jun-2019
डॉ. मनमोहन वैद्य
सह सरकार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 
निवडणुकीच्या काळात भारतात युद्धासारखे वातावरण दिसत होते. आता सारी धूळ बसल्यावर चित्र स्पष्ट झाले आहे. देशाच्या जनतेने एका राष्ट्रीय पक्षाला मजबूत समर्थन देऊन सत्तारूढ केले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीत, विभाजनवादी राजकारण करणार्‍या गटांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही अकारण आधारहीन आरोप लावले जात होते.
 
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांच्या वक्तव्यांचा संदर्भ सोडून, कुठल्याही आधाराविना उल्लेख करून संघाचे नाव अकारण ओढले गेले. परंतु, कुणी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचा उल्लेखही केला नाही. खरे म्हणजे संघाचे मूळ तर डॉक्टर हेडगेवारच आहेत. अशात, त्यांच्या व्यक्तित्वाला जाणल्याविना संघाला समजणे शक्य नाही. 21 जूनला त्यांच्या महानिर्वाणाला 89 वर्षे झालीत. या निमित्त भ्रामक संदर्भांची धूळ झटकण्यासाठी, तसेच संघाला खर्‍या अर्थाने समजून घेण्यासाठी डॉक्टरजींचे एक स्मरण गरजेचे आहे. 

 
 
डॉ. हेडगेवार देशभक्त आणि श्रेष्ठ संघटक होते. भारतीय दर्शन, संस्कृती तसेच इतिहासाचा सखोल अभ्यास केल्यामुळे व त्याचा अनुभव घेतल्यामुळे तत्कालीन आव्हाने, त्यावरील उपाय तसेच भविष्याबाबतच्या त्यांच्या संकल्पना स्पष्ट होत्या. ते एक प्रकारे द्रष्टा visionary होते. He was deeply rooted in the philosophy, culture and history of Bharat and simultaneously had a farsighted vision for future. थोडक्यात, सामान्य दिसणारे डॉक्टर असामान्य प्रतिभेचे धनी होते.
 
ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध त्यांच्या मनात किती चीड होती, हे त्यांच्या लहानपणीच्या अनेक घटनांनी स्पष्ट दिसते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सुरू असलेला अिंहसक सत्याग्रह ते सशस्त्र क्रांतीपर्यंत सर्व आंदोलनांत ते सतत सक्रिय राहिलेत. परंतु, सोबतच स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आवश्यक मानसिक, धार्मिक, सामाजिक क्रांतीचे महत्त्वही ते चांगलेच जाणत होते. म्हणूनच त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी संपूर्ण समाजाचे संघटन करण्याचे कार्य प्रारंभ केले. केवळ तुरुंगात जाणे म्हणजे देशभक्ती नाही, बाहेर राहून समाजात जागृती करणेदेखील तुरुंगात जाण्याइतपतच देशभक्तीचे कार्य आहे, असे त्यांनी पहिल्या सत्याग्रहात भाग घेते वेळी 1921 मध्ये म्हटले होते. तेव्हा त्यांचे वय केवळ 31 वर्षे होते. त्यांचे मन त्या काळातील ‘राष्ट्रीय मानसिकते’शी समरस होते. His mind was in tune with the 'National Mind' of his times.
 
दोन वर्षे भारतभ्रमण केल्यानंतर 1893 मध्ये स्वामी विवेकानंद अमेरिका व नंतर युरोपला गेले. चार वर्षांनंतर 1897 मध्ये पश्चिमेकडील देशांहून भारतात परत आल्यानंतर त्यांनी भारतीयांना साररूपात तीन गोष्टी सांगितल्यात. पहिली- पश्चिमेकडून आम्हाला संघटन कसे करावे ते शिकले पाहिजे. दुसरी- आम्हाला मनुष्य घडविण्याची एखादी पद्धत, तंत्र विकसित केले पाहिजे. तिसरी- सार्‍या भारतीयांनी येणार्‍या काही वर्षांसाठी आपल्या देवी-देवतांना बाजूला ठेवून एकाच देवतेची आराधना केली पाहिजे आणि ती म्हणजे आपली भारतमाता. संघकार्य आणि संघाच्या शाखा या तीन गोष्टींचे मूर्तरूप आहे.
 
‘जातिप्रथा आणि त्याचे निर्मूलन’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच गोष्टीला अधोरेखित केले आहे की, ‘‘राजकीय क्रांती नेहमीच सामाजिक आणि धार्मिक क्रांतीनंतरच झाली आहे, असे इतिहास सांगतो.’’ मार्टिन ल्युथर किंग यांनी सुरू केलेले सुधारणा आंदोलन युरोपच्या लोकांच्या राजकीय मुक्तीची पूर्वपीठिका होती. नैतिकतावादानेच (Puritanism) इंग्लंड व अमेरिकेत राजकीय स्वातंत्र्याची आधारशिला ठेवली. मुस्लिम साम्राज्याचीही हीच कहाणी आहे. अरबांच्या हाती राजकीय शक्ती येण्यापूर्वी हजरत मोहम्मद यांनी केलेल्या सांप्रदायिक क्रांतीच्या मार्गानेच त्यांना जावे लागले. भारताचा इतिहासदेखील याच निष्कर्षाला बळ देतो. चंद्रगुप्तांच्या नेतृत्वात झालेल्या राजकीय क्रांतीच्या आधी तथागत बुद्धांची धार्मिक-सामाजिक क्रांती घडून गेली होती.
 
महाराष्ट्रातही संतांनी केलेल्या धार्मिक-सामाजिक सुधारणांनंतरच शिवाजी महाराजांच्या नेतृत्वात तिथे राजकीय क्रांती संभव झाली. गुरू नानक देव यांच्या धर्म आणि सामाजिक क्रांतीनंतरच शिखांची राज्यक्रांती झाली. ‘‘कुठल्याही राष्ट्राच्या मुक्तीसाठी प्रारंभिक आवश्यकता म्हणून त्याचे मन आणि आत्मा मुक्त असणे आवश्यक आहे,’’ हे समजण्यासाठी एवढी उदाहरणे पुरेशी आहेत. आणि म्हणून, स्वातंत्र्याच्या आंदोलनाला सफल आणि सबळ बनविण्यासाठीच डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्राच्या मन आणि आत्म्याच्या मुक्तीचे कार्य म्हणजेच समाजाच्या संघटनेचे कार्य प्रारंभ केले, हे वास्तव आपण समजून घेतले पाहिजे.
 
रवींद्रनाथ ठाकूर यांनीदेखील आपल्या ‘स्वदेशी समाज’ नामक पुस्तकात ही बाब आग्रहपूर्वक मांडली आहे. कल्याणकारी राज्य (Welfare state) संकल्पना भारतीय परंपरेत नाही. भारतीय समाजाचे सर्व आवश्यक कार्य राज्याच्या अधीन नसायचे. काहीच महत्त्वाचे विभाग राज्याच्या अधीन राहायचे आणि अन्न, जल, स्वास्थ्य, विद्या इत्यादी सर्व विषय समाजाच्या अधीन राहात आले आहेत. जर तंबू एकाच खांबावर उभा असेल आणि तो खांब जर तुटला तर सर्व व्यवस्था धराशायी होतात. परंतु, तंबू जर चार-पाच खांबांवर उभा असेल आणि एखाद्या खांबाला क्षती पोहचली तरी तो धराशायी होत नाही.
 
त्याला आतल्या आतूनच दुरुस्त करून पुन्हा उभा करणे शक्य असते. त्यामुळेच, इस्लामी जिहाद आणि ख्रिस्ती क्रूसेड यांना, ज्या राज्यांमध्ये सर्व व्यवस्था राज्याधारित होत्या त्या राज्याचा शासक परास्त झाल्यानंतर तेथील सर्व लोकांना मुसलमान अथवा ख्रिस्ती करणे शक्य झाले. परंतु, भारतात 850 वर्षांपर्यंत इस्लामी शासकांचे आणि 150 वर्षे ख्रिश्चनांचे शासन राहिल्यावरही ते केवळ 15 टक्क्यांना मुसलमान आणि तीन टक्क्यांना ख्रिश्चन करू शकले. असे केवळ भारतातच शक्य झाले. कारण, भारताची समाजरचना राज्यावर आधारित व्यवस्थेच्या एकमेव खांबावर टिकून नव्हती. राज्याहून स्वतंत्र अशा समाजाच्या व्यवस्था होत्या.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रचनादेखील याच तत्त्वांवर झाली आहे. संघाचे कार्य तर संपूर्ण स्वावलंबी आहे, राज्यावर अजीबात आधारित नाही. संघाच्या स्वयंसेवकांकडून एक लाख 30 हजारांहून अधिक सेवाकार्ये जी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये सुरू आहेत, त्यातीलही 90 टक्के सेवाकार्ये सरकारी मदतीवर अवलंबून नाहीत. मी गुजरातमध्ये प्रांत प्रचारक होतो तेव्हा केशुभाई पटेल यांच्या नेतृत्वातील भाजपाच्या राजवटीत, जनजातीय विकासासाठी आवंटित राशी वनवासी कल्याण आश्रमाला देण्याचा विचार भाजपाने केला.
 
वनवासी कल्याण आश्रमाची अनेक सेवाकार्ये जनजातीय क्षेत्रात आहेत. परंतु, कल्याण आश्रमच्या कार्यकर्त्यांनी हा निधी स्वीकारण्यास नकार दिला. काही वर्षांपूर्वी एका कार्यकर्त्याने मला विचारले की, कल्याण आश्रम सरकारी मदत का घेत नाही? मी त्याला आचार्य विनोबा भावे यांच्या भाषेत उत्तर दिले की, ‘‘सरकारकडे पैसा कुठून येतो? समाजच सरकारला कराच्या रूपात पैसा देतो. म्हणजे सरकार नोकर आहे आणि समाज मालक. मग आम्ही नोकराला कशाला मागायचे? मालकालाच मागत असतो आणि तो देतही असतो.’’
 
ओरी ब्रेफमन व रॉड बेकस्ट्रॉम लिखित ‘द स्टारफिश अॅण्ड स्पायडर’ नामक पुस्तकात संस्था आणि समाज यांचे ‘पॉवर स्ट्रक्चर’ कसे असते, याची तुलना केली आहे. यासाठी दोन उपमांचा उपयोग केला आहे. एक स्पायडर (कोळी) आहे, ज्याला अनेक पाय असतात. एक-दोन पाय तुटले तरी त्याचे काम अडत नाही. त्याची संपूर्ण जीवनशक्ती त्याच्या लहानशा डोक्यात केंद्रित असते. एकदा का ते डोके नष्ट झाले तर तो कोळी मरण पावतो. दुसरीकडे स्टारफिश असा मासा आहे, ज्याची जीवनशक्ती एका जागी केंद्रित न राहता सर्व शरीरात अनेक केंद्रांमध्ये विखुरली असते. त्यामुळे स्टारफिशमध्ये असे एखादे स्थान नसते की जे नष्ट केले की तो मरून जाईल. तुम्ही त्याचे दोन तुकडे केलेत तर त्यातून दोन स्टारफिश तयार होऊ शकतात. हे समजण्यासाठी या पुस्तकात लेखकांनी एक उदाहरण दिले आहे.
 
लॅटिन अमेरिकी इतिहासतज्ज्ञ प्रोफेसर नेविन यांनी आपल्या पुस्तकात एक घटनाक्रम सांगितला आहे. सोळाव्या शतकात युरोप आणि स्पेनहून अनेक जण आपले सैन्य घेऊन इतर भागांना लुटण्यासाठी, सोने शोधण्यासाठी जहाजाने निघाले. हा काळ ‘सी एक्सपेडिशन’ म्हणून ओळखला जातो. याप्रमाणे स्पेनच्या सैन्याची एक तुकडी आपल्या जहाजाने लॅटिन अमेरिकेच्या भूभागाकडे वळली. जिथे जमीन दिसली तिथे जाऊन ती बळकावयाची होती. 1519 साली स्पॅनिश सैन्याची एक तुकडी ‘एझ्टेक’ नामक जनजातीच्या राज्यात पोहोचली. तेथील मुखियाच्या डोक्यावर बंदूक ताणून आदेश दिला की, तुमच्याजवळचे सर्व सोने द्या, नाहीतर मारून टाकू. त्या मुखियाने स्वप्नातही विचार केला नव्हता की, अशा लूटमारांशी आपली कधी गाठ पडेल. त्याने स्वाभाविकच स्वत:चा जीव वाचविण्यासाठी राज्यातील सर्व सोने त्यांना देऊन टाकले.
 
त्यांनी सोने घेतल्यावरदेखील त्याला मारून टाकले. दोनच वर्षांत, 1521 पर्यंत संपूर्ण एझ्टेक राज्य स्पॅनिश लोकांच्या ताब्यात आले. 1534 साली अशीच एक स्पॅनिश तुकडी लॅटिन अमेरिकेच्या अशा भूभागावर पोहोचली जिथे ‘इन्का’ नामक जनजातीचे राज्य होते. तिथेही याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्यात आली आणि दोनच वर्षांमध्ये, 1536 पर्यंत ‘इन्का’ जनजातीच्या राज्याला स्पॅनिश सैन्याने गिळंकृत केले. परंतु, 1618 मध्ये एक अनोखी घटना घडली. स्पेनची एक तुकडी 1618 साली ‘अपाची’ नामक जनजातीच्या राज्यात पोहोचली. तेथेही त्यांनी तिथल्या मुखियाला मारून टाकले. लुटण्याइतपत ही जनजाती संपन्न नव्हती. म्हणून स्पॅनिश लोकांनी त्यांना कन्व्हर्ट करत, शेतीत मजूर म्हणून लावणे सुरू केले. परंतु, हळूहळू त्यांच्या लक्षात आले की, मुखियाला मारून टाकल्यानंतरही समाजात विरोध सतत वाढत आहे आणि आतापर्यंत सर्व ठिकाणी ज्याप्रमाणे दोन-तीन वर्षांमध्ये संपूर्ण राज्य स्पॅनिशांच्या ताब्यात येत असे, तसे इथे झाले नाही. 200 वर्षे संघर्ष चालला आणि शेवटी स्पॅनिश सेनेला तिथून माघारी जावे लागले.
 
हे सांगून प्रो. नेविन लिहितात की, ‘एझ्टेक’ आणि ‘इन्का’जवळ जे सैन्य होते त्यांच्या तुलनेत ‘अपाची’चे सैन्य अधिक बलवान नव्हते. तसेच ‘अपाची’वर आक्रमण करणारी स्पॅनिश सेना इतर दोन स्पॅनिश सेनेहून कमकुवत होती असेही नव्हते, तरीही असे कसे घडले? प्रो. नेविन लिहितात- अपाची समाजाची संरचना राज्याधारित नव्हती. इथे समाजाचे सर्व शक्तिकेंद्र मुखियाजवळ एकत्रित नव्हते. समाजाच्या स्वत:च्या व्यवस्था होत्या, ज्या राज्यापासून स्वतंत्र होत्या. म्हणून राज्य पराजित झाल्यानंतरही समाज पराजित झाला नाही आणि प्रदीर्घ संघर्ष करू शकला. या रचनेला समजणे आवश्यक आहे.
 
म्हणून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले, ‘‘कुठल्याही राष्ट्राच्या राजकीय मुक्तीसाठी प्रारंभिक गरज म्हणून त्याच्या मन आणि आत्म्याची मुक्तता आवश्यक असते,’’ हे तत्त्व, स्वामी विवेकानंदांनी ‘‘आम्हाला राष्ट्र म्हणून संघटित होण्याची गरज आहे,’’ याला अधोरेखित करणे, तसेच समाजाधिपती, समाजनायक यांच्या माध्यमातून ‘स्वदेशी समाजा’ची निर्मिती करणे आणि ती टिकवून ठेवणे, हे किती महत्त्वाचे, जीवनावश्यक महत्त्वाचे मूलभूत कार्य आहे, हे लक्षात येईल. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रयत्नांमध्ये या कार्याची आवश्यकता आणि अनिवार्यतेला ध्यानात घेऊनच डॉक्टर हेडगेवारजींनी संपूर्ण समाजाला राष्ट्रीय दृष्टीने जागृत तसेच सक्रिय करीत संपूर्ण समाजाला संघटित करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपात सुरू केले, याच्या महत्त्वाला समजून घेतले पाहिजे. म्हणूनच डॉ. हेडगेवार एक महान द्रष्टा तसेच कुशल संघटक म्हणून ओळखले जातात...