उत्कंठा उपांत्य फेरीची

    दिनांक :30-Jun-2019
मिलिंद महाजन 
 
आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या प्रारंभापूर्वी अनेक क्रिकेटतज्ज्ञांनी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत अशा तीन संघांना विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले होते. यात आयसीसी वन-डे मानांकनात अव्वल स्थानावर राहिलेल्या यजमान इंग्लंडला प्रबळ दावेदार मानले जात होते, तर गत विश्व स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रेलिया जेतेपद कायम राखेल, असे काही तज्ज्ञांनी म्हटले होते. गत दोन-तीन वर्षांपासून सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करणारा भारतीय संघच यंदाचा विश्वकरंडक जिंकेल, असा विश्वास काही क्रिकेट पंडितांनी व्यक्त केला. आता विश्व स्पर्धा अंतिम टप्प्यावर येत आहे. 
 
 
जर.. तर...या भाषेत प्रतिस्पर्धी संघांचा उपांत्य फेरीचा मार्ग अवलंबून आहे. यात आतापर्यंत गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिलेल्या यजमान इंग्लंडची स्थिती तर फारच बिकट झालेली आहे. रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात रविवारी निर्णयाक सामना होणार आहे. या सामन्यातील विजयामुळे दोन्ही संघांचे भविष्य बदलू शकते. कारण इंग्लंडने जर हा सामना गमावला तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते. दुसरीकडे हा सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान मजबूत करण्यासाठी भारताचा संघ उत्सुक आहे. गुणतालिकेत भारत दुसर्‍या स्थानावर आहे. भारताने सहा सामन्यात पाच सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे भारताला एका गुणावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे भारताचे 11 गुण आहेत. त्यामुळे हा सामना जर भारताने जिंकला तर 13 गुणांसह ते उपांत्य फेरी गाठू शकतात.
 
विश्वचषकाच्या प्रारंभी इंग्लंड अव्वल स्थानावर होता, मात्र आता इंग्लंड उपांत्य फेरी गाठेल की नाही अशी साशंकता आहे. कारण आतापर्यंत इंग्लंडने सातपैकी चार सामने िंजकले आहेत, तर तीन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इंग्लंड आठ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पण इंग्लंडने जर उर्वरित दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. रविवार 30 जूनला भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात जर पावसाने व्यत्यय आणला तर दोन्ही संघांना एक गुण मिळू शकतो. मात्र त्यामुळे इंग्लंडचे या स्पर्धेतील आव्हान धोक्यात येऊ शकते. तसे या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे. पूर्ण दिवस चांगला सूर्यप्रकाश असेल. एकूण काय भारताने आपला जिगरबाज खेळ करून इंग्लंडला चारही कोने चीत करायला पाहिजे, ही शुभेच्छा.