मैत्री

    दिनांक :30-Jun-2019
रमेश जलतारे
 
‘प्रेम कुणावरही करावे’ ही कुसुमाग्रजांची अत्यंत गाजलेली कविता. मैत्री कुणाशीही करता येते का? मैत्री हे अलवार नात्याचं एक नाव आहे. मैत्री म्हणजे जिव्हाळा. मैत्री म्हणजे विसावा. मैत्री म्हणजे चंद्राचं शीतल चांदणं. मैत्री म्हणजे अंत:करणाची भाषा. मैत्री म्हणजे तळहातावरील मेंदीची रेषा. मैत्री इंद्रधनूचा पिसारा आणि गतकाळातील आठवणींचा पसारा. मैत्री म्हणजे विश्वास आणि संजीवन देणारा श्वास. मैत्री एक आभास आणि प्रेमाच्या गावाकडे जातानाचा प्रवास. एक न दिसणारा नाजूक धागा. 

 
 
जे आपलंसं वाटतं त्याच्याशी जडलेलं अनाम नातं म्हणजे मैत्री. मित्र, स्नेही, सखा, सवंगडी, यार, दोस्त... या नावांनी मित्र ओळखले जातात. परिचित म्हणजे मित्र नव्हे. रक्ताचं नातं असेल, पण दोघांमध्ये मैत्री असेलच असे नाही. ‘मुलांसोबत मित्राप्रमाणे (मर्यादित स्वरूपात) वागावे,’ असे म्हटले जाते, पण बाप म्हणजे मित्र नाही. आईदेखील मैत्रीण नसते. मैत्रीचं नातं समवयस्कांमध्ये अधिक दृढ होऊ शकतं. काही वेळा, काही नाती, काही कारणांसाठी मैत्रीची होऊ शकतात. शंभर टक्के नि:स्वार्थ भावनेने निर्दोष मैत्री फारच क्वचित संभवते. मैत्री हा असा अनमोल हिरा आहे, जो प्रत्येकालाच गवसतो, असं नाही. ज्याला तो मिळतो तो मात्र सुदैवी! मित्र अंधारलेल्या रात्रीस दिसणारा एक प्रकाशकिरण असतो. कुठलाही भेदभाव मैत्रीच्या आड येत नाही.
 
वेदांमध्ये मित्र या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आढळते- ‘प्रमीते: त्रायते। संमिन्वान: दवति इति वा.’ थोडक्यात, मरणापासून तारणारा, किंवा पाण्याने भिजवीत अंतरिक्षात धावत जाणारा, तो मित्र. अर्थात, वरुणदेवतेला अनुसरून हे वर्णन आलेले आहे, हे उघड आहे. ऋग्वेदातच आणखी एका ठिकाणी मित्राचं वर्णन, ‘हाका मारून लोकांना एकत्रित करणारा, शेतकर्‍यांकडे लक्ष ठेवणारा, पूर्व दक्ष म्हणजे पुण्यकर्मात कुशल, माणसांना कार्यदक्ष करणारा, त्यांना उद्यमशील बनविणारा असे म्हटले आहे.
 
मित्राचा दिवसाशी संबंध असतो, तर रात्रीचा संबंध वरुणाशी असतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या अर्थी सूर्य हा माणसाचा खरा मित्र होतो. इराण, बाबीलोन इ. देशांत मित्रपूजा अर्थात सूर्याची पूजा व्हायची. सूर्य हा खर्‍या मित्राप्रमाणे, सुहृद, दयाळू, सृष्टीला संजीवन देणारा प्रकाशमान देव आहे, अशीही वर्णने वेदवाङ्‌मयात आढळतात. खर्‍या मित्राचीही तीच लक्षणे असल्याने, सूर्य हाच मित्र ठरतो. पर्शियन भाषेत सूर्याला ‘मित्र’ म्हटले आहे.
 
‘मिथ्र’ (पर्शियन), ‘मिहिर’ (संस्कृत). मार्कंडेय पुराणात सूर्याला मिहिर या नावाने संबोधिले आहे. सीरियन भाषेत ‘मेतृ’ हा शब्द भेटतो. जलदगतीने पाऊस आणणारा, या अर्थाने सीरियन भाषेत हा शब्द उपयोजिला आहे.
कुठलाही स्वार्थ किंवा अपेक्षा मनात न बाळगता एकमेकांबद्दलचा स्नेह याला मैत्री असे नाव आहे. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीची कथा सर्वांना ज्ञात आहे. मैत्रीच्या नात्यात उच्चनीच असता कामा नये. तसे आपल्या देशात हिंदी चित्रपटांनी मैत्रीच्या भावनेची विविध रूपे प्रेक्षकांपर्यंत नेऊन पोहोचवली आहेत. मैत्री हा शब्द उच्चारताच जय आणि वीरू नजरेसमोर येतात. धरम-वीर, दोस्ताना, याराना, यारी-दुश्मनी वगैरे चित्रपटांतून मैत्री आपल्या भेटीस आलेली आहेच. दोस्त आणि दोस्ती हे दोन्ही चित्रपट खूप गाजले. मराठीतसुद्धा ‘दोस्त असावा तर असा’ हा चित्रपट येऊन गेला. मैत्रीवरची सुश्राव्य गाणीही त्या काळात ऐकायला मिळाली. सिनेमावाल्यांनी मैत्रीच्या सुंदर नात्याला छानसे व्यावसायिक साचात बसवले. खरेतर ‘शब्दांवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले’ हा भाव मैत्रीसाठीही तंतोतंत लागू पडतो.
 
मैत्री दोन माणसांमध्ये, दोन स्त्रियांमध्ये, दोन भिन्निंलगी व्यक्तींमध्येच होते असे नाही, मुके प्राणीदेखील माणसाचे मित्र असू शकतात. वयात अंतर असलेल्या व्यक्तीही मित्र असू शकतात. अनाथांना आपुलकी देऊन मित्रत्व सिद्ध करता येते. जी माणसे एकटी पडली आहेत, निराशेने ग्रासलेली आहेत, त्यांना खर्‍या अर्थाने मैत्रीची गरज असते. ज्यांची मने दुभंगली आहेत, ज्यांना घरदार सोडून दूर कुठे आश्रय शोधावा लागतो अशांना मैत्री हवी आहे. जे मरणप्राय शारीरिक वेदना सहन करताहेत आणि मृत्यूची वाट बघत आहेत त्यांना मैत्रीची गरज आहे. जे घरदार सोडून अनोळखी प्रदेशात देशाची राखणदारी प्राणपणाने करत आहेत त्यांना मैत्रीची गरज आहे. जे आपले नाहीत त्यांना आपल्या मैत्रीची गरज आहे. ज्ञानेश्वरमाउली म्हणतात,
भूतां परस्परे जडो। मैत्र जिवांचे।
 
या जगतात प्रत्येक प्राण्याला दुसर्‍या प्राण्याबद्दल स्नेह वाटू दे ही प्रार्थना, संपूर्ण विश्वाच्या कल्याणाचीच प्रार्थना आहे...