मान्सूनच्या बिलंबामुळे विदर्भात ४७ टक्के तूट

    दिनांक :30-Jun-2019
 महाराष्ट्रात 25 टक्के कमी पाऊस
 
मुंबई: वायव्य मान्सूनला झालेल्या विलंबामुळे विदर्भामध्ये सरलेल्या जूनमध्ये बरसलेल्या पावसात 47 टक्के, तर महाराष्ट्रामध्ये 25 टक्के तूट निर्माण झाली. एरवी या कालावधीत राज्यात सरासरी 207.6 मिमी पाऊस पडतो, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
वायव्य मान्सूनने दिलेल्या फटक्यामुळे जूनमध्ये मराठवाड्यात 33 टक्के, तर मध्य महाराष्ट्रात 21 टक्के तूट निर्माण झाली. त्यामुळे या विभागांचा अपुर्‍या पावसाच्या ‘डी’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यातील तुटीचे प्रमाण केवळ सात टक्के असल्याने या विभागाचा सामान्य श्रेणीत समावेश करण्यात आल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
ठाणे जिल्ह्यात जूनमध्ये 503 मिमी पाऊस झाला. हे चांगले संकेत असून, हे प्रमाण सामान्य सरासरी 461.9 मिमी पेक्षा 9 टक्क्यांनी अधिक आहे. पालघरमध्ये याच कालावधीत 373. मिमी पाऊस झाला. मुंबईचा पाणीपुरवठा याच जिल्ह्यांतील धरणांमधून होतो. या दमदार पावसामुळे मुंबईकरांच्या पेयजलाची चिंता दूर झाली आहे, असे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.
साधारणपणे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडतो. त्यामुळे हा भाग तुटीचा प्रदेश मानला जातो, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि पुण्यासारख्या शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, या भागातील धरणे भरण्यासाठी आणखी पावसाची गरज असल्याचे हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.