आत्महत्येचा व्हिडिओ पाहून ‘तिने' गमती-गमतीत लावला गळफास

    दिनांक :30-Jun-2019
१३ वर्षाच्या मुलीचे कृत्य
 
नागपूर: दोन मुलींनी गळफास घेतल्याचा व्हिडियो यू ट्युबवर पाहिल्यानंतर त्याचा डेमो करीत असताना एका १३ वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तहसील हद्दीत हंसापुरी येथे उघडकीस आली.
शिखा विनोद राठोड (१२) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
 

 
 
राठोड कुटुंबिय मुळचे आग्रा (उ. प्र.) येथील राहणारे. काही वर्षांपूर्वी कामाच्या शोधात तिचे वडील विनोद राठोड हे कुटुंबियांसह नागपूरला आले. शिखाला आईवडिल, दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. तिचे वडील बॅग तयार करण्याचे काम करतात. तिची मोठी बहिण दहाव्या वर्गात असून शिखा ही निराला हायस्कूल येथे सातव्या वर्गात शिकत होती. घरातील मंडळीशी संवाद साधता यावा म्हणून तिच्या वडिलांनी मोबाईल घेतला होता. हा मोबाईल ते घरीच ठेवत असत. त्यामुळे शिखा ही मोबाईल हाताळत असे. काही दिवसांपूर्वी तिने यू ट्युबवर दोन मुली आत्महत्या करीत असल्याचा व्हिडियो पाहिला होता. हाच व्हिडियो तिने आपल्या आईला देखील दाखविला होता. व्हिडियो पाहून तिने डेमो करण्याचा निर्णय घेतला होता.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास तिची आई घरकाम करीत होती. शिखा आणि तिची लहान बहिण मागच्या खोलीत खेळत होत्या. खेळता खेळात तिची लहान बहिण बाहेर निघून गेली. शिखाने डेमो करण्याच्या प्रयत्नात सिलिंग पंख्याला नायलॉनच्या पट्टा बांधला आणि गळफास लावण्याचे नाटक करीत होती. तोच फास आवळल्या गेला आणि ती पंख्याला अटकली. लगेच तिची बहिण घरात आली असता शिखा लटकलेल्या अवस्थेत दिसली. हा प्रकार तिच्या आईला समजताच तिला खाली उतरविले आणि मेयो रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.