अकोट तालुक्यात अतिवृष्टी; बोर्डी नाल्यात अवजड यंत्राचा ट्रक उलटला

    दिनांक :30-Jun-2019
अकोट शहरात १०० मिलीमीटर पावसाची नोंद
पणजजवळ कच्चा पूल-रस्ता वाहून गेला
आलेवाडीजवळ पूल व पाईप वाहून गेले
प्रशासनामध्ये सतर्कतेचा अभाव
अकोट: अकोट शहरासह मुंडगांव व अकोलखेड मंडळात शनिवारच्या रात्री अतिवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.अकोट शहरात तर रात्रीला १०० मिलीमिटर मुसळधार पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे.तालुक्यात पणज जवळ बोर्डी नदीवर सुरु असलेल्या पुलाच्या बांधकामाजवळील कच्चा बाह्यवळण पुल-रस्ता वाहून गेला.त्यामुळे अवजड यंत्र असलेला एक ट्रक उलटला.तर शेगांव मार्गावरील आलेवाडीजवळचा पुल वाहून गेला.शेगांव मार्ग तुर्तास वाहतूकीसाठी बंद झाला आहे.असे असले तरी तालुक्यातून अतिवृष्टीच्या नुकसानाबाबत अद्याप क्षेत्रीय कर्मचा-यांकडून सुचना प्राप्त झाल्या नसल्याची माहिती स्थानिक महसूल अधिका-यांनी दिली.

 
प्राप्त सुत्रानुसार,शनिवारला सायंकाळी सहा वाजता शहरात पावसाला सुरुवात झाली.रात्री दहा वाजताच्या सुमारास पावसाचा वेग खुप वाढला.त्याच दरम्यान शहरातील विज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता.थोडा वेळ मंदावल्यावर रात्री साडेअकराला हाच पाऊस मुसळधार स्वरुपात बरसू लागला.अकोट शहरात सकाळपर्यंत १०० मिलीमिटर पावसाची नोंद तहसिल कार्यालयाने घेतली.मुंडगांव मंडळात ९८ मी.मी.,अकोलखेड ८० मी.मी.,कुटासा ५७ मी.मी,पणज ४० मी.मी.,उमरा २८ मी.मी,आसेगांव २५ मी.मी.तर चोहट्टा मंडळात सर्वात कमी १५ मी.मी.पावसाची नोंद करण्यात आली.
६५ मी.मी.वरील पाऊस हा अतिवृष्टी म्हणून संबोधला जातो.अतिवृष्टीबाबत हवामान खाते व जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना व नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो.परंतू या अतिवृष्टीपूर्वी कोणताही इशारा प्राप्त झाला नसल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.त्यामुळे या अतिवृष्टी बाबत हवामान खाते व जिल्हा प्रशासन खरोखरच सतर्क होते का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेगांव मार्गावरील देवरी फाट्याजवळील आलेवाडी गावाजवळच्या नाल्याला पुर आल्याने त्यावरील पूल व पाईप वाहून गेले.त्यामुळे वाहतूक थांबली.रविवार सुट्टीचा दिवस असल्याने व आषाढी यात्रेचे पर्व समोर असल्याने असंख्य भाविक शेगांवला दर्शनासाठी जात असतात.परंतू पूल वाहून गेल्याने भाविकांना आलेवाडीजवळ अडकून पडावे लागले.तर दुसरीकडे पणज जवळील बोर्डी नदीजवळ पुलाचे बांधकाम सुरु होते.या पुलालगत वाहतूकीसाठी कच्चा बाह्यवळण पूल-रस्ता तयार करण्यात आला होता.हा पुल-रस्ताच वाहून गेला.तसेच या रस्त्यावर उभा असलेला अवजड यंत्राचा एक ट्रक नाल्यात उलटला.सुदैवाने या घटनेदरम्यान जीवीतहानी झाली नाही.
या मुसळधार पावसामुळे पेरणीपूर्वीच अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे.मात्र या वृत्ताला महसूल विभागाकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.तालुक्यातील नुतनीकरण सुरु असलेल्या रस्त्यांवर या पावसामुळे चिखल पसरला असून दूचाक्या व इतर वाहने घसरण्याच्या घटना घडत आहेत.या अतिवृष्टीमुळे सुस्तावलेल्या प्रशासनाला जागे करण्याची गरज जनमानसात व्यक्त होत आहे.