बेअरस्टोचे आक्रमक शतक, इंग्लंडचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान

    दिनांक :30-Jun-2019
लंडन,
सलामीवीर जॉनी बेअरस्टोचे आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने ३३७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. मैदानाच्या चौफेक फटकेबाजी करत इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. बेअरस्टोने १११, बेन स्टोक्सने ७९ तर जेसन रॉयने ६६ धावांची खेळी केली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३३८ धावांची गरज आहे. 

 
जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत खोऱ्याने धावा ओढल्या. अखेरीस कुलदीप यादवने जेसन रॉयला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयला सुरेख झेल टिपला. यानंतर बेअरस्टो आणि जो रुट जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. बेअरस्टोने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं.
अखेरीस कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०० पल्याड धावसंख्या गाठेल अशी खात्री असलेला इंग्लंडचा संघ अचानक संकटात सापडला. मात्र बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला.
पुन्हा एकदा मोहम्मद शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत शमीने इंग्लंडला आणखी धक्के दिले. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली.