आरटीजीएस, एनईएफटी व्यवहार आजपासून स्वस्त

    दिनांक :30-Jun-2019
मुंबई: आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून होणार्‍या निधी हस्तांतरणावर कोणतेही शुल्क न आकारण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला असून, त्याची अंमलबजावणी उद्या सोमवारपासून केली जाणार आहे. यामुळे हे व्यवहार उद्यापासून स्वस्त होणार आहेत.
 

 
 
1 जुलैपासून आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवर शुल्क आकारणी न करण्याची घोषणा केल्यावर, या निर्णयाचा फायदा ग्राहकांना याच तारखेपासून ग्राहकांना मिळावा, असे बँकांना सांगितले होते. मोठ्या मूल्याच्या तत्कालीन निधी हस्तांतरणासाठी रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) यंत्रणेचा वापर केला जातो. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त निधी हस्तांतरित करण्यासाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) यंत्रणेचा वापर केला जातो.
डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आरटीजीएस आणि एनईएफटीच्या माध्यमातून होणार्‍या निधी हस्तांतरणावर शुल्क आकारणी न करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला. ग्राहकांना आकारले जाणारे शुल्क कमी करण्यासाठी बँकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे, असे इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील मेहता यांनी सांगितले.