विद्युत तारेचा करंट लावून वाघाची शिकार; सहा जणांना अटक

    दिनांक :30-Jun-2019
कातडे, नखे आणि सांगाडा जप्त
 
भंडारा: शेतात जिवंत विद्युत तारांच्या सहायाने वाघाची शिकार करणा-या सहा जणांना भंडारा वनविभागाने अटक केली आहे. यांच्याकडून वाघाचे कातडे, वाघनखे, बिबट्याची नखे, चितळाचे शिंग व रानडूकराचे शिजलेले मांस अधिका-यांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे शिकारीनंतर शेतशिवारात पुरून ठेवलेला वाघाचा सांगडाही यावेळी जप्त करण्यात आला.
 
 
 
 
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय यांना मिळालेलया गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी सहका-यांना घेऊन तुमसर तालुक्यातील सितासावंगी येथील मणिराम गंगबोयर यांच्या घरी 29 जून रोजी धाड टाकली. यावेळी अधिका-यांना 26 बाय 30 सेमी आकाराचे वाघाचे कातडे, 7 नग चितळाचे शिंग, रानडूकराचे शिजलेले व कच्चे मांस आढळून आले. अधिक चौकशी केली असता 28 जून रोजी शब्बीरबाबु यांच्या शेतात शीव मदन कुंभरे यांच्या मदतीने विजेच्या जीवंत तारेच्या माध्यमातून वाघाची शिकार केल्याचे मणिराम गंगबोयर यांनी सांगितले. कुंभरे यांच्या घरी वनविभागाच्या अधिका-यांनी तपासणी केली असता शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य त्यांच्या हाती लागले. दरम्यान रानडुकराचे मांस गुढरी येथील विजय संजय पारधी व गोबरवाही येथील रवींद्र रहांगडाले यांना विकल्याचेही पुढे आले. यांच्या घराची पुन्हा तपासणी केली असता घरातून 22 वाघाची नखे, 2 बिबट्याची नखे जप्त करण्यात आली. वाघाच्या शिकारीनंतर चामडे काढून आरक्षित वनपरिक्षेत्रात पुरलेला वाघाचा सांगडाही वनविभागाच्या अधिका-यांनी हस्तगत केला आहे. सदर प्रकरणी सर्व सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून 5 जुलै पर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे. प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी कोडापे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.