कायम पट्ट्यासाठी नगराध्यक्षांचा उपोषणाचा इशारा

    दिनांक :30-Jun-2019
 प्रधानमंत्री कार्यालय व मुख्यमंत्री यांचे कडे तक्रार
वणी: प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत वणी नगर परिषद क्षेत्रात 1265 घरे मंजूर आहेत. शासकीय जागेवर ज्यांचे अतिक्रमण आहे. अशा अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायम पट्टे अजून देण्यात आले नाही. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने जागेची मोजणी करून या अतिक्रमण धारकांना कायम पट्टे देण्यात यावे यासाठी नगर सेवकासह दि. 7 जुलै पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा वणी नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिला आहे.
 

 
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा उपलब्ध आहे. त्यांच्या साठी घरकुल मंजूर होऊन त्यांना धनादेश माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले होते. परंतु शासनाच्या धोरणानुसार ज्या व्यक्तींनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तात्पुरत्या स्वरूपात कच्ची घरे बांधली आहेत. अशांना सुद्धा या योजने अंतर्गत घरकुल मंजूर करून या जागेचे कायम पट्टे देऊन घरकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परंतु वणी नगर परिषद क्षेत्रात मागील एक वर्षात या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना कायम पट्टे देण्यासाठी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालायकडून या जागेची मोजणी करून देणे अपेक्षित होते. परंतु अद्याप पावेतो या कार्यालयाने मोजणी करून करून न दिल्यामुळे या लाभार्थ्यांना कायम पट्टे मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. व या योजनेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयाने या लाभार्थी अतिक्रमण धारकांचे जमिनीची मोजणी पुढील सात दिवसाचे आत करून द्यावी अन्यथा दि. 7 जानेवारी पासून उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचे नगराध्यक्षांनी एका निवेदनाद्वारे इशारा दिला आहे. त्यानंतरही कार्यवाही करण्यात न आल्यास दि. 10 जुलै पासून लाभार्थ्यासह आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
या प्रकरणाची तक्रार नगर परिषदेचे अध्यक्ष तारेंद्र बोर्डे हे मा.पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री यांच्या कडे सुद्धा केली आहे.