महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    दिनांक :30-Jun-2019
पुणे: राज्यात मॉन्सून सक्रिय झाले असून, कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली; तर विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली. कोकण-गोव्यासह विदर्भातील पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

 
मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणात धुवाधार पाऊस पडत आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडल्या. चोवीस तासांत बंगालच्या उपसागरात उत्तरेकडे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्‍यता आहे. नैॡत्य मोसमी पावसाची उत्तरीसीमा शनिवारी स्थिर होती.
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण असल्याने दोन ते तीन दिवसांत नैॡत्य मोसमी वारे देशाच्या मध्य भागात, पश्‍चिमेकडे आणि उत्तरेकडे सरकण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.