शिवसेना मराठा समाजाच्या कायमच पाठीशी - उद्धव ठाकरे

    दिनांक :30-Jun-2019
मुंबई: शिवसेना मराठा समाजाच्या पाठीशी कायमच उभी असून त्यांच्या प्रत्येक लढाईत सोबत असू, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शनिवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आरक्षणाला दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानले. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

 
 
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत उद्धव यांनी आझाद मैदानात आंदोलकांची भेटही घेतली होती. उच्च न्यायालयातही मराठा आरक्षण वैध ठरल्याने जल्लोष केला जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे वकील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव यांची भेट घेऊन आभार मानले. कोणत्याही श्रेयासाठी मराठा समाजाला पाठिंबा दिला नव्हता, आरक्षणासाठी दिल्लीत लढाई लढावी लागली तरी शिवसेना मराठा समाजाच्या पाठीशी राहील, असा विश्‍वासही उद्धव यांनी व्यक्त केला. विरोध करायचा म्हणून करू नका, असे आवाहनही त्यांनी आरक्षणविरोधी गटाला केले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न करावेत, आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्यास शिवसेनेने मदत करावी, अशी विनंतीही विनोद पाटील यांनी केली.