अमरावतीत भाजपाने विधानसभेसाठी कसली कंबर

    दिनांक :04-Jun-2019
सहा विधानसभेचे बुथस्तरापर्यंतचे नियोजन 

 
 
तभा ऑनलाईन टीम  
अमरावती,
प्रत्येक विधानसभेचा सखोल अभ्यास राजकीय समिकरणे, सामाजिक अभिसरण सोशल इंजिनियरिंग, बुथ निहाय अभ्यासासाठींची समिती, पदाधिकारी दौरे, निरीक्षकांच्या भेटी आदी उपाययोजनांचा उपयोग करत, भारतीय जनता पार्टी पुढील 15 दिवसात विधानसभेची प्राथमिक तयारी पूर्ण करणार आहे व 1 लाख कार्यकर्त्यांना सक्रिय करणार आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी दिली.
 
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजपा त्वरीत आपला अ‍ॅक्शन प्लॅन देवून सक्रिय झाला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 6 विधानसभांच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील सुमारे 150 कार्यकर्ते येत्या 12 दिवसात पंचायत समिती स्तरापर्यंत जावून सामाजिक, राजकीय व संघटनात्मक स्थितीचा अहवाल तयार करणार असून पंचायत समिती स्तराच्या खाली 5-6 बुथ मिळून क्लस्टर तयार करतील.
 
येत्या 23 जूनला भारतीय जनता पार्टी, अमरावती जिल्ह्यातील विस्तरीत कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली असून तत्पुर्वी विधानसभा टिम व विधानसभा समितीच्या बैठका होणार आहेत. या बैठकीला दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील.
 
भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचे रुपांतर सोशल मिडीया कक्ष, वॉर रुमसाठी तयार करण्यात येणार असून 15 ऑगस्टपर्यंत हे अद्यावत कार्यालय कार्यान्वित होईल. जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी महाराजस्व अभियान व आरोग्य शिबिरांचे प्रत्येक तालुक्यात आयोजन करण्यात येईल. 30 ऑगस्ट 2019 पर्यंत विविध 15 प्रकारचे अभियान व कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा समन्वय तसेच जिल्ह्यातील बुथते जिल्हा पातळीवरील 1 लाख कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविण्यासाठीच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी सरचिटणीस हरिशचंद्र पाटील खंडाळकर यांना देण्यात आली.
 
संघटनात्मक कामांची बांधणीकडे सरचिटणीस गजानन कोल्हे लक्ष देणार असून राजकीय विस्ताराचे काम तात्यासाहेब मेश्राम पाहतील. जनतेच्या प्रश्नांवर प्रस्ताव व धोरणांचा अभ्यास करण्याचे कार्य सरचिटणीस जयंत आमले यांच्याकडे सोपविले आहे. विविध स्तरावरील कार्यक्रमांचे निवडणूक व्यवस्थापन, प्रशिक्षण, शाखा विस्तार तसेच प्रदेश व राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी व नेत्यांचे दौरे व नियोजनाचे काम सरचिटणीस रविराज देशमुख पाहतील.
 
समाजउपयोगी उपक्रम, प्रकल्प व मदत कार्याचे संपूर्ण संचालन व क्रियान्वयाचे काम राजेश्वर निस्ताने पाहतील. पुढील 1 महिन्यात जिल्ह्यातील सुमारे 1 लाख भाजपाचे कार्यकर्ते सक्रिय करण्याचे व या सक्रिय झालेल्या कार्यकर्त्यांना निवडणूक व्यवस्थापनात व्यवस्थितरित्या संलग्नित करण्याचे कार्य होईल. जिल्ह्यातील बुथ कार्यकर्त्यांचे संमेलन जूनच्या शेवटच्या आठवड्यात होईल. तसेच बुथवरील 25 कार्यकर्ते व इतर पदाधिकार्‍यांचा मेळावा जुलै महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल. ज्याला जिल्ह्यातील 70 हजार बुथ स्तरावरील कार्यकर्ते सहभागी होतील. भारतीय जनता पार्टी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 6 विधानसभा दिमाखदार विजय संपादित करण्यासाठी प्रचंड नियोजन व खूप कष्ट करण्यासाठी सज्ज झाली असून ग्रामीण भागातील आठही विधानसभा मजबूत करुन जिंकण्याचे नियोजन लगेच अंमलात आणत आहे, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दिनेश सुर्यवंशी यांनी दिली.