डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिटन दौर्‍यात निदर्शने

    दिनांक :04-Jun-2019
लंडन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तीन दिवसांच्या ब्रिटन दौर्‍यावर आहेत. आपल्या या दौर्‍याची सुरुवात त्यांनी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेऊन केली. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलानियाही उपस्थित होत्या. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचा दौरा प्रारंभ होण्यापूर्वी लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर टि्‌वट करीत टीका केली होती. या टीकेमुळे ब्रिटनमधील अनेक शहरांमध्ये ट्रम्प यांच्या दौर्‍याचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आलीत. लंडन, मँचेस्टर, बर्मिंगहॅम आदी शहरांत ट्रम्पविरोधी ही निदर्शने झालीत.
 
 
 
ट्रम्प यांनी सादिक खान यांच्याबद्दल टि्‌वट केले की, लंडनचे महापौर म्हणून सादिक खान यांनी अतिशय खराब कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या दौर्‍यामुळे ते अतिशय त्रासलेले दिसतात. खरेतर, ब्रिटन आणि अमेरिकेचे मैत्रीचे संबंध आहेत. त्यांनी माझ्याकडे लक्ष देण्याऐवजी लंडनमधील गुन्हेगारीवर लक्ष द्यायला हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते, तर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालायची काही गरज नाही, असे वक्तव्य सादिक खान यांनी केले होते.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांचे बँिंकगहॅम राजवाड्यात औपचारिक स्वागत करण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्यासाठी एक छोटेखानी भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यावेळी राजकुमार चार्ल्सही उपस्थित होते. त्यानंतर ट्रम्प यांनी टि्‌वट करून, लंडनचा दौरा खूप छान सुरू आहे. राजघराणे अतिशय अगत्यशील असून, अमेरिका-ब्रिटनचे संबंधही मजबूत आहेत, असे नमूद केले.
दुसरीकडे, मजूर पक्षाचे नेते जेर्मी कॉर्बिन यांनी ब्रिटन सरकारने ट्रम्प यांच्यासाठी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत.