प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    दिनांक :04-Jun-2019
 
सॅनफ्रॅन्सिस्को: एअर इंडियाच्या बोईंग-777 विमानाच्या एका छायाचित्रावरून प्रवाशांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानाच्या दरवाजाजवळ एक छिद्र दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, हे विमान अमेरिकेत सुरक्षित रीत्या उतरले आहे. दरम्यान, एअर इंडियाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
एअर इंडियाचे प्रवक्ते धनंजय कुमार यांनी यासंबंधी टि्‌वट करुन सांगितले की, बी-777 एअरक्राफ्ट-व्हीटी-एएलएच हे विमान अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथे यशस्वीरीत्या उतरले आहे. या विमानाची तपासणी सुरू असताना विमानाच्या दरवाजाजवळ पत्रा कापला गेल्याने एक छोटेसे छिद्र दिसून आले. यानंतर एअर इंडियाने अमेरिकेतील विमानाची देखभाल करणार्‍या संस्थेची मदत मागितली आहे.
वास्तविक छोटेसे असलेले हे छिद्रही विमानाच्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरू शकले असते. सुदैवाने, अशा प्रकारची कोणतीही दुर्घटना घडली नाही. मात्र, विमानाच्या या छिद्राचे छायाचित्र समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.