हुवाईसोबतचा करार इन्फोसिस पुन्हा तपासणार

    दिनांक :04-Jun-2019
-इतर कंपन्याही करणार अनुकरण
 
बंगळुरू: अमेरिकेने चीनमधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी हुवाईवर प्रतिबंध लादल्यावर या देशाच्या कायद्यांमध्ये अडकू नये यासाठी आता इन्फोसिसदेखील हुवाईसोबतच्या कराराचे पुनर्लोकन करीत आहे. भारतातील माहिती व तंत्रज्ञान कंपन्या इन्फोसिसचे अनुकरण करण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मागील महिन्यात अमेरिकेने हुवाई कंपनीवर प्रतिबंध लादत या कंपनीचा समावेश स्वतंत्र यादीत केला आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे या चिनी कंपनीला हार्डवेअरची खरेदी-विक्री, सॉफ्टवेअर आणि सेवा अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान पुरवठादार कंपन्यांना सेवा देता येणार नाही. मात्र, अमेरिकी उपकरणे खरेदी करण्यासाठी हुवाईला तीन महिन्यांची सूट देण्यात आली आहे. ही सुविधा ऑगस्टपर्यंत राहील.
इन्फोसिसने हुवाईसोबत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे आणि अमेरिकी मूळ तंत्रज्ञानाशी संबंधित सर्वच व्यक्ती अथवा कंपन्यांवर अमेरिकेचे निर्यात नियंत्रण लागू होते, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. भारतातील विप्रो आणि कॉग्निझंट या कंपन्यांचाही हुवाईसोबत करार आहे. इन्फोसिसची हुवाईसोबत धोरणात्मक भागीदारी असून, अमेरिकी कायद्याच्या कचाट्यात अडकू नये यासाठी इन्फोसिस हुवाईसोबतच्या कराराचे पुनर्लोकन करीत आहे.
 
 

 
 
 
कराराचे पुनर्लोकन करण्यासाठी इन्फोसिस सल्लामसलत करीत आहे. याबाबतचा निर्णय घेणे सोपे नाही आणि ही कंपनी हुवाईसोबत काम करणे थांबवेल, असाही याचा अर्थ होत नाही. हुवाईसोबत संबंधविच्छेद करायचा झाल्यास यासाठी परवान्यांची गरज लागेल का, याची चाचपणी इन्फोसिस करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हुवाईसोबत असलेल्या कराराबाबत आणि कोणत्याही परिणामांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे का, याबाबत प्रतिक्रिया देण्यास इन्फोसिस, विप्रो आणि कॉग्निझंट कंपनीने नकार दिला आहे. अमेरिकी प्रतिभूती आणि विनिमय आयोगानेही (एसईसी) अमेरिकेत नोंदणी झालेल्या कंपन्यांच्या कामाबाबत संभाव्य पद्धतीने नियंत्रण आणण्याच्या आपल्या भूमिकेबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे. हुवाई कंपनीनेही या घडामोडींबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकी प्रतिभूती आणि विनिमय आयोगाने इन्फोसिसच्या हुवाईसोबत असलेल्या व्यावसायिक संबंधांची चौकशी केली होती. या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तरीत्या आपल्या उत्पादनांचा प्रस्ताव सीरिया आणि सुदानला दिला होता. या देशांना या दोन्ही कंपन्या अप्रत्यक्षपणे आपले सॉफ्टवेअर आणि सेवा पुरवतात का, याची चौकशी अमेरिकेने केली आहे.
सीरिया आणि सुदानमध्ये हुवाईसोबत काम करीत नसल्याचे इन्फोसिसने अमेरिकेच्या प्रतिभूती आणि विनिमय आयोगाला सांगितले आहे.