लघु उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणार- नितीन गडकरी

    दिनांक :04-Jun-2019
- खात्याची सूत्रे स्वीकारली
 
नवी दिल्ली,
देशात आयात होणार्‍या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांच्या माध्यमातून तयार करून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा भर राहील, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मंगळवारी या मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर केले.
 
उद्योग भवन येथे गडकरी यांनी राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांच्या उपस्थितीत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी विभागाचे सचिव डॉ. अरुण कुमार पांडा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

 
पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, आयात होत असलेल्या वस्तू ग्रामीण भागातील लघु उद्योगांमध्ये तयार होतील व त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. आयात होणार्‍या वस्तुंची देशात निर्मिती झाल्यास पैसा वाचेल आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यात येईल. या माध्यमातून उद्योगांना गती येईल.
 
कृषी क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांपासून तसेच मध, बांबू आदी उत्पादनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील उद्योग गती घेतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. देशातील लघु उद्योग बंद का पडतात, याचे अध्ययन करून, यावर उपाययोजना करण्यात येतील. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत महामंडळ व संस्थांच्या समस्या जाणून, त्या सोडविणे व या संस्था सक्षम करण्यासही आपले प्राधान्य असेल, असेही ते म्हणाले.