वैभव गेहलोत यांच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलट यांनी घ्यावी: अशोक गेहलोत

    दिनांक :04-Jun-2019
जोधपूर: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधला अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येतांना दिसतोय. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये निवडणूक निकालामुळे तणावाचे वातावरण आहे. अशोक गेहलोत यांनी मुलाच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. वैभव गेहलोतच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलट यांनी स्वीकारावी असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

 
 
 
सचिन पायलट उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आहेत. वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. अशोक गेहलोत यांच्या विधानावर सचिन पायलट यांनी आश्चर्य व्यक्त केले असून यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.
एका मुलाखतीत अशोक गेहलोत यांना जोधपूरच्या जागेसाठी वैभव यांच्या नावाची शिफारस सचिन पायलट यांनी केली होती हे खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे सचिन पायलट यांनी सांगितले तर बरे होईल असे उत्तर दिले. जोधपूर लोकसभा मतदारसंघात आपले सहा आमदार आहेत. त्यामुळे आपण तिथून मोठया मताधिक्याने विजय मिळवू असे पायलट म्हणाले होते. आमचा प्रचार सुद्धा चांगला झाला होता. त्यामुळे त्यांनी त्या जागेची जबाबदारी घ्यावी. जोधपूरची जागा आम्ही का जिंकलो नाही त्याचे सखोल विश्लेषण झाले पाहिजे असेही गेहलोत म्हणाले.