सुदानमध्ये आंदोलकांवर गोळीबार, ३५ ठार

    दिनांक :04-Jun-2019
आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न
खार्टूम: आफ्रिकेतील सुदानच्या राजधानीमध्ये सत्ताधारी लष्करी राजवटीविरोधात सेना मुख्यालयाबाहेर आंदोलन करणार्‍यांवर सेनेद्वारे गोळीबार करण्यात आला. यामध्ये सुमारे 35 आंदोलक ठार झाले असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि आंदोलकांचे तंबू जाळून टाकले.
या गोळीबारानंतर सैन्याच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांच्या विरोधात सक्तीने वागण्याची धमकी दिली आहे. हे आंदोलक मागील महिनाभरापासून मुख्यालयाबाहेर तळ ठोकून आहेत. मात्र, सोमवारी सैन्याने आंदोलक राहत असलेली जागा रिकामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्यानंतर आंदोलनाने िंहसक वळण घेतले.
दरम्यान, सुदानच्या सैन्य परिषदेच्या प्रमुखांनी आंदोलकांच्या नेत्यांना जबाबदार धरले आहे. जनरल अब्देल फतह बुरहान यांनी सांगितले की, सैन्य पऱिषद आंदोलकांसोबत झालेले सर्व सामंजस्य करार रद्द करीत आहे. सात महिन्यांच्या आत देशामध्ये निवडणुका घेण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.