पोथरा धरण परिसरात मोठा रोहीत मुक्कामी

    दिनांक :04-Jun-2019
हिंगणघाट,
पाणथळ जागी थव्याने राहणारा, उंच मान, लांब पाय, गुलाबी किंवाकि फिक्कट गुलाबी रंगाची पीसे असलेला फिनिकोप्टेरस जातीतला मोठा रोहीत हा पक्षी आता पोथरा नाला धरणा जवळ मुक्कामी आला. उष्ण कटिबंध प्रदेशात आढळनारा हा पक्षी भारतात ही विपुल प्रमाणात आढळतो. हा पक्षी स्थानीय स्थलांतर करतो. हा कच्छ च्या रण (गुजरात) चा मूळ रहिवाशी आहे. कच्छ मध्येच यांचे प्रजनन होते. कच्छ हा भूभाग मानवी वस्ती पासून लांब असल्याने यांची येथे झपाट्याने वाढ होते. येथील पाणी आटल्यावर हा पक्षी आंतर देशीय पाणी मुबलक असलेल्या धरणपरिसरात स्थलांतर करतो. असे स्थलांतर करून काही दिवसाच्या मुक्कामाने तो पोथरा येथील जलाशयाच्या ठिकाणी मुक्कामी आला आहे .
 

 
 
छोटे मासे, किडे, पान वनस्पती, शेवाळ हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे. आणि पोथरा धरण परिसरात हे सर्व विपुल प्रमाणात असल्याने या पक्षाला येथे मुक्काम करणे सहज शक्य होते. आणि त्यामुळेच हा मोठा रोहीत दरवर्षी इथे मुक्कामी येतो, अशी माहिती पक्षी मित्र प्रवीण कडू यांनी सदर प्रतिनिधीला दिली.
 
नुकतीच पर्यावरण प्रेमी मंडळी आशिष भोयर, हितेश ठोंबरे, व सहकाऱ्यांनी पोथरा येथे जाऊन या पक्षांची नोंद केली. त्यांच्या निरीक्षणात १८ पक्षांचा थवा आढळला. चंद्रपूरचे वन्यजीव छाया चित्रकार विकील शेंडे, राधव पेचे यांनी फ्लेमिंगो चे छाया चित्रण केले.
 
पोथरा येथे जाळे लावुन पक्षाची शिकार केली जात असल्याच्या यापूर्वीच्या तक्रारी आहेत. त्या अनुषंगाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पक्षाचे संरक्षण संवर्धन करण्याची मागणी वन्यजीव प्रेमी नी केलेली आहे.
तापमान ४५ अंशाचे वर असूनही या देखण्या पक्षाला भेटण्यास पर्यावरण प्रेमी, या उन्हातही पोथरा येथे गर्दी करताना प्रतिनिधीस आढळले.