ममता बॅनर्जींचे डोके तर फिरले नाही?

    दिनांक :04-Jun-2019
 
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झाले तरी काय, असा प्रश्न संपूर्ण देशातील जनतेला पडला आहे. लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. 2014 मध्ये राज्यातील 42 पैकी 34 जागा जिंकणाऱ्या  ममता बॅनर्जी यांना यावेळी फक्त 22 जागांवर समाधान मानावे लागले. 2014 मध्ये राज्यात दोन जागा जिंकणार्‍या भाजपाने यंदा 18 जागा जिंकत इतिहास घडवला आहे. भाजपाने राज्यात मारलेल्या जोरदार मुसंडीमुळे ममता बॅनर्जी यांचे डोके तर फिरले नाही, अशी शंका त्यांच्या वागणुकीतून येऊ लागली आहे. ममता बॅनर्जी राज्यात जो गोंधळ घालत आहेत, ते पाहून लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारच्या जुलमी राजवटीविरुद्ध लिहिलेल्या ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ या प्रसिद्ध अशा अग्रलेखाची आठवण येते. टिळकांच्या अग्रलेखाच्या धर्तीवरच ‘ममता बॅनर्जी यांचे आणि त्यांच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असा प्रश्न विचारावासा वाटतो.
गेल्या काही दिवसांपासून ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारची वागणूक पाहता, ममता बॅनर्जी यांचे आणि त्यांच्या सरकारचेही डोके ठिकाणावर नाही, याची खात्री पटते. ममता बॅनर्जी जशा वागत आहेत, तसा कोणताही शहाणा राजकारणी वागणार नाही. मेंदूवरचा ताबा सुटलेली व्यक्तीच ममता बॅनर्जी यांच्यासारखी वागू शकते. त्यामुळेच केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ममता बॅनर्जींना ‘गेट वेल सून!’ (लवकर बर्‍या व्हा!), असा संदेश पाठवला असावा.
 

 
 
 
ममता बॅनर्जी या बंगाली असल्या तरी त्या जिंदूच आहेत, याबाबत देशवासीयांच्या मनात शंका नाही. मात्र, ममता बॅनर्जी आपल्याला जिंदू समजतात की नाही, याबाबत शंका घ्यायला जागा आहे. ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून ममता बॅनर्जी यांचे डोके का फिरते, असा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना काही लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्यामुळे, ममता बॅनर्जी यांनी आपला ताफा थांबवून त्या लोकांना चामडी सोलून काढण्याची धमकी दिली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या बैठकस्थळासमोर ‘जय श्रीराम’च्या घोषणा देत निदर्शने करणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांवर पोलिसांनी अमानुष असा लाठीहल्ला केला. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला हा प्रकार शोभणारा नाही.
रामायण मालिका दूरदर्शनवर पाहताना त्यातील रावणाला, रामाला कुणी श्री लावले की, प्रचंड संताप यायचा. ‘‘श्री मत बोलो,’’ अशी गर्जना रावण करायचा. त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांचे झाले की काय, असे वाटते आहे. कुणी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या की, ममता बॅनर्जी यांची तळपायाची आग मस्तकात जाते. एखाद्वेळ पाकिस्तानात कुणी ‘जय श्रीराम’ म्हटले आणि त्यावर कुणी आक्षेप घेतला तर ते समजण्यासारखे आहे, मात्र भारतात, विशेषत: पश्चिम बंगालमध्ये ‘जय श्रीराम’वर आक्षेप घेतला जातो, ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणार्‍यांना तुरुंगात डांबले जात असेल, तर ते अतिशय निषेधार्ह आहे. भाजपा खासदार साक्षी महाराज, ममता बॅनर्जी यांना ‘हिरण्यकश्यपुच्या वंशज’ म्हणत असतील, तर त्यांच्यावर आक्षेप कसा घ्यायचा? साक्षी महाराजांचे विधान हे राजकीय सभ्यतेचे नसले, तरी त्यासाठी त्यांना दोष कसा द्यायचा?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांनी कोणती राजकीय सभ्यता पाळली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्याचा शिष्टाचारही ममता बॅनर्जी यांना पाळता आला नाही. मोदी यांनी, तृणमूल कॉंग्रेसच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना या समारंभासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते, या लोकांना आमंत्रित केल्यामुळे बॅनर्जी यांनी शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला. असे करून ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला आणखी छोटे करून घेतले आहे. अप्रत्यक्षपणे त्यांनी तृणमूल कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या हिंसाचारात भाजपा कार्यकर्ते मारले गेल्याची कबुली देऊन टाकली आहे! त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांचा सामना करण्याची त्यांची मत झाली नसावी.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला चढवतात, या हल्ल्याला भाजपा कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला की, भाजपाला बदनाम करायचे, अशी तृणमूल कॉंग्रेसची पद्धत आहे. भाजपाची कार्यालये जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. भाजपाच्या एका कार्यालयावरील कमळचिन्ह मिटवून त्या ठिकाणी आपल्या तृणमूल कॉंग्रेसचे चिन्ह रेखाटण्याचा पोरकटपणा ममता बॅनर्जी करताना एका छायाचित्रात दिसतात. ममतांची वागणूक तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याला शोभणारी असली, तरी मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. ममता आपल्या वागणुकीने मुख्यमंत्रिपदाचे अवमूल्यन करीत आहेत. स्वत:हून आपल्या सरकारच्या बरखास्तीचा मार्ग प्रशस्त करीत आहेत. ‘जय श्रीराम’च्या घोषणेचा आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपा उपयोग करत असल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप आहे. ममता बॅनर्जी यांचा आरोप खराही असल्याचे एकवेळ मान्य केले, तरी या घोषणेमुळे ममता बॅनर्जी यांना चवताळण्यासारखे काय आहे, याचे उत्तर मिळत नाही.
‘जय श्रीराम’च्या घोषणांमुळे भाजपाला राजकीय फायदा मिळत असेल, तर ममता बॅनर्जी यांनीही ‘जय श्रीराम’च्या घोषणा आपल्या राजकीय फायद्यासाठी द्यायला हरकत नाही. कारण, आज जो तमाशा ममता बॅनर्जी करत आहेत, तो त्यांच्या राजकीय फायद्यासाठीच आहे ना? गेल्या काही महिन्यांतील ममता बॅनर्जी यांची भूमिका आपल्या राजकीय फायद्यासाठी मुस्लिमधार्जिणी आणि राज्यातील मुस्लिमांच्या तुष्टीकरणाची राहिली आहे. त्यातूनच त्यांनी राज्यात िंहदूविरोधी राजकारणाची भूमिका घेतली असल्याचे जाणवते. पण, असे करून ममता बॅनर्जी आपल्या पायांवर दगड पाडून घेत आहेत, आपले दीर्घकालीन नुकसान करून घेत आहेत. दोन वर्षांत राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळेच ममता बॅनर्जी यांच्या पागलपणाला जोर चढला आहे. मुस्लिम मतांच्या भरोशावर आपली राजकीय नौका पार होईल, असे त्यांना वाटत असेल, तर तो त्यांचा भ्रम आहे. 2011 आणि 2016 मध्ये ममता बॅनर्जी यांनी राज्यात जो विजय मिळवला, तो फक्त मुस्लिम मतांमुळे नाही, तर हिंदूनींही त्यांना साथ दिल्यामुळे. पण, याची जाणीव ठेवण्याइतकी कृतज्ञताही त्यांच्यात दिसत नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला धक्का बसला आहे. उत्तरप्रदेशच्या योगी मंत्रिमंडळातील समाजकल्याण मंत्री रमापती शास्त्री यांनी, ममता बॅनर्जी यांना सद्बुद्धी मिळावी, अशी प्रार्थना ईश्वराजवळ केली असल्याचे सांंगितले. ममता बॅनर्जी यांची सद्य:स्थिती पाहता, अशी प्रार्थना फक्त शास्त्री यांनी नाही, तर देशातील सर्व जनतेने करण्याची वेळ आली आहे! कारण पश्चिम बंगालच्याच नाही, तर देशाच्या दीर्घकालीन हितासाठी ममता बॅनर्जी यांना सद्बुद्धी येण्याची नितान्त गरज आहे. ममता बॅनर्जी यांना लवकरात लवकर अशी सद्बुद्धी आली नाही, तर राज्यातील जनता विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही!