सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर

    दिनांक :04-Jun-2019
अकोटला शहर पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई

नजिकच्या इतिहासातील पहिलीच कारवाई
अकोट - शहरात सोमवार सकाळी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा धूम्रपान करणे,या विषयी गुन्हे दाखल झाल्याचे निदान भारतात तरी ऐकायला मिळत नाही, परंतू अकोट शहराच्या नजिकच्या इतिहासात अश्या स्वरुपाचा बहूदा पहिलाच गुन्हा नोंदविल्या गेला असावा.

 
 
या संदर्भात शहर पोलिसांच्या सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार,सकाळी पावणेअकराच्या सुमारास किशोर कहार रा.पाचपोर प्लॉट,अकोट यांच्या विरुध्द अकोट नगरपरिषदेच्या परिसरात धूम्रपान केले म्हणून पोलिसांनी कारवाई केली. तर सकाळी साडेअकराच्या सुमारास,अब्दुल शाबीर अब्दुल सत्तार रा.अंजनगांव रोड,अकोट यांच्या विरुध्द बस स्थानक परिसरात बीडीचे झुरके मारले म्हणून कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी जमादार कासम नवरंगाबादी यांच्या पथकाने कारवाई करुन शहर ठाण्यात तक्रार दिली.त्यावरुन कोटपा कायद्याच्या चार,२१ कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले.