पाकिस्तानवर क्रिकेट स्ट्राईक

    दिनांक :04-Jun-2019
मौेके पे चौका!
- कौतिकराव
 
एकत किरकेटची मॅच, त्यातई थे हाय वर्ल्ड कपची... म्हंजे मजाक नाही भाऊ. चार वर्षानं येते हे स्पर्धा. तेच्यातबी आता पाकिस्तानसंग सामना व्हनार हाय म्हनल्यावर जीव जाव का जलेबी खाव पहात लगातेच अन्‌ जिताबी लागते. आता जितनं आमच्या हातात नसते. त्याच्यापाई किमान पहा त नक्कीच लागते. आम्ही मॅचबी नाही पाह्यली त विराटभौले का वाटन? त्याच्यापायी आता मॅच त पाहाच लागते. चार कामं बाजूले ठेवून पाहा लागते. तसीबी आमची गती 'फ्री बट नॉट अव्हेलेबल' असी असते. आमाले कामच नसते असं नाही; पन आम्ही ते करत नाही. असं असतानी एखांदं काम कर्‍याच झालंच त मंग आमी ते परफेक्शनिस्ट असतो. म्हंजे मायनं भाजी सांगली सकायी आनाले त आमी सांजेले रिकामा झोरा घेऊन घरी जातो अन्‌ मंग इचारलं घरी का नाही आनली का? त आमी विचारतो, का नाही आनली? 
 
 
हे (दुर्ग)गती असते आमची. आमाले भाजी आनाची होती हेच ध्यानात राहात नाही. आमी भाजी पाह्यत नाही मार्केटात असं नाही. पन आमाले पाह्यजे असते मटारच्या शेंगा अन्‌ मे मयन्यात त्या नाही भेटत, याची आमाले चीड आलेली असते...
 
त असो... अस्या व्यस्त वेळापत्रकातई आमाले मॅच पाहाची हायच. इंग्लंडलेच जावून पाह्यली असती. आमची औकात नाही लंडनले जाची असं नाही, पन ज्यायनं आमच्या देसावर दीडशे वर्ष राज केलं त्यायच्या देसात आमी जानार नाही, असं आमी ठरवूनच टाकलं हाय.
 
तरीबी टिव्हीवर मॅच पाहाची हाय. त्या दिसी मंग टिव्हीले उदबत्ती दाखवाची. गजानन बाबाचा फटू ठिवाचा टिव्हीच्या वर. आमचा गजानन बाबा नाहीत साईबाबाच बारावे खिलाडू असतेत अन्‌ तेच खरी मॅच जितवते. आमी किरकेटचे इतके नॉलेजेबल मान्स हाव का टिव्हीत पीच पाहून आमाले समजते का विराटनं टॉस जितला त आदी बॅटींग घ्याची का फिल्डींग ते. तरीबी विराट बेटा त्या धोनीले इचारते. आमी आमच्या शुभेच्छा अनुष्काभाभी संग पाठवल्या हायत.
 
भारत- पाकिस्तान मॅच म्हंजे सर्फरोशी की तमन्नाच रायते ना भाऊ. डांगचिऽऽक, डगांऽऽग असते ना मॅच. त्यायच्या बॅटस्‌मननं एखांदाबी चौका मारला का असं वाटते का अ‘खी फौजच घालाव पाकिस्तानच्या उरावर... वाटते का स्टेनगन घ्याव अन्‌ ताड्‌ताड्‌ गोया घालाव पाकड्यायवर... मंग जागच्या जागी हातपाय चालतेत अन्‌ मॅच संपल्यावर हाता, पायाले टेंगळं येएल रायते. तवा समजते का मॅच पाह्यतानी हात, पाय चालले थे बाजूच्या आलमारीवर नाहीत भिंतीवर आदयले होते. मॅच जितली का आमचं ‘भारत माता की जय’ लंडनवरी आयकू जाते अन्‌ हारलो त आमची अवस्था काँग्रेसच्या गडीगुपचूप प्रवक्त्यायवानी होते... सांगताबी येत नाही अन्‌ सह्यनबी होत नाही. केंद्र सरकारनं पाकिस्तानवर दोनवेळा सर्जिकल स्ट्राईक केला. आता किरकेट स्ट्राईक कराचा टायम हाय. नाई थ्या इम्रान खानच्या हुतनाडीत हानली त माहं नाव कौतिकराव नाही!