कलोपासक रघुराजपूर

    दिनांक :04-Jun-2019
संजय गोखले
9422810501
 
‘पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल बंग...’, आपल्या राष्ट्रगीतात उल्लेख झालेले उत्कल राज्य म्हणजे आजचे ओडिशा. उडिसा, उत्कल, किंलग, उद्रदेश, महाकंतरा आणि हिराखंड ही प्राचीन नावे धारण करणारे आजचे ओडिशा. हिराखंड नावावरून संबलपूर जवळच्या विशाल बांधार्‍याचे नाव ‘हिराकुंड डॅम’, ठेवले आहे. ओडिशा या नावाची उत्पत्ती ‘ओड्र’ या शब्दापासून झाली आहे. या राज्याची स्थापना भागीरथ वंशाच्या ‘ओड’ राजाने केली होती.
 
सम्राट अशोकाने इ.स.पूर्व 261 मधे किंलग (ओडिशा) वर विजय संपादन केला. किंलगच्या युद्धांत दहा लाख लोकांच्या नरसंहाराने व्यथित झालेल्या अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला. या पुढे इ.स.पूर्व 232 मध्ये अशोकाच्या मृत्यूनंतर इथे मौर्य वंशाचे राज्य आले. पुढे सातवाहन, गुप्त वंशाचे राज्य आले. महान सम्राट हर्षवर्धन व नृसिंह देव यांच्या काळात चित्रकला, मूर्तिकला, मंदिर स्थापत्य यांने उच्च शिखर गाठले. नृिंसहदेव याने विश्वप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर बांधले. इ.स 1361 मध्ये सुलतान फिरोज शाह तुगलकने ओडिशा पादाक्रंात केले आणि कलेचा विकास थांबला. पुरी इथल्या काही कलाकारांनी ओडिशाची ही संपन्न कला परंपरा जतन केली. अशाच कलाकारांच्या एका गावाला आज आपण भेट देणार आहोत.
 

 
 
पर्यटनप्रेमी लोकांची ओडिशा यात्रा कोणार्क, जगन्नाथपुरी आणि भुवनेश्वर पर्यंतच मर्यादित असते. पुरी पासून फक्त 14 कि.मी. अंतरावर कलेचा समृद्ध वारसा जपणारे रघुराजपूर गाव हमखास पर्यटकांच्या नजरेतून सुटते. जगन्नाथपुरी वरून भुवनेश्वरला जाणार्‍या नॅशनल हायवे 316वर चंदनपूर गाव आहे. चंदनपूर वरून फक्त 1.5 कि.मी. अंतरावर भार्गवी नदीच्या काठी कलाकरांचे गाव रघुराजपूर वसले आहे. चंदनपूर वरून पायी चालत रघुराजपूर कडे जावे, रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, सुपारी, फणसाची झाडे रस्त्याची शोभा वाढवतात. या गावात 120 घरे आहेत. प्रत्येक घरात कलेची साधना करणारे परिवार वास्तव्यास आहेत. गावाच्या वेशीवर कलाकारांच्या परिवाराचे सदस्य कलाप्रेमींची वाट बघत उभे असतात. त्यांच्या सोबत गावाचे अवलोकन एक मोठा आनंददायी प्रवास आहे. प्रत्येक घरात 10 वर्षांच्या नातवा पासून 80 वर्षांचे आजोबा हस्तकलेची उपासना करताना दिसतात. प्रत्येक घरात येणार्‍या पर्यटकांचे स्वागत केले जाते.
 
सुपारीवर बारीक चित्रकाम, पेपियर मेश चे मुखवटे, टसर सिल्क वर चित्रकला, ताडपत्रा वर बारीक कोरीव कलाकुसर आणि पट्‌टचित्र इथले विशेष कला प्रकार आहेत. पट्‌टचित्र ही कला जवळपास 2000 हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. कापडावर चुना पावडर आणि प्राकृतिक डिंकाचे थर देउन कॅनव्हॉस सदृश पट तयार केला जातो. त्यावर फुले, वनस्पती, रंगीत माती, खनिज पदार्थ इत्यादी पासून बनवलेल्या नैसर्गिक रंगाने विविध चित्र तयार केली जातात. चित्रांचा विषय पौराणिक कथा, कृष्ण लीला, विविध देवता या ठराविक चौकटीत बसणाराच असतो. एक पट्‌टचित्र तयार करायला 1 महिना लागतो. ताडपत्रांवर केलेली बारीक कलाकुसरपण अद्वितीय असते.
 
ताडपत्रांवर बारीक सुईने कोरून चित्र रेखाटले जाते, त्यावर कोळशाच्या बारीक भुकटीचा थर देतात नंतर हा थर पुसून काढतात. कोरलेल्या चित्ररेखांमध्ये काळारंग घट्‌ट बसतो आणि गुळगुळीत भागावरचा काळा रंग निघाल्यावर काळ्या रंगात उत्कीर्ण केलेल्या अद्भुत चित्राचा आविष्कार होतो. ही अद्भुत कला आकार घेताना आपण प्रत्यक्ष पाहणे हा एक वेगळा अनुभव आहे. इथल्या अनेक कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ओडिसी या नृत्य शास्त्राचे सर्वात महान गुरू आणि कलाकार पद्मविभूषण केलुचरण महापात्रा याच गावाचे आहेत. त्यांच्या परंपरेला पुढे चालवणारे ओडिसीचे शिक्षक या गावात आजही नृत्य कला शिकवतात.
 
इथे येणार्‍या पर्यटकांनी काही कला वस्तू विकत घ्याव्या, ही माफक अपेक्षा या कलाकारांना असते. न घेतल्यास कौतुकाचे दोन शब्द कानी पडावे एवढ्यावरपण हे कलाकार समाधानी होतात. गावातले प्रत्येक घर कलेचे उपासना स्थळ असलेल्या जगातील एकमेवाद्वितीय गावाला ओडिशाच्या भ्रमंतीत जरूर वेळ द्यावा.