मॅकडोनाल्ड बर्गरमध्ये अळ्या; ग्राहकाला देणार ७० हजार

    दिनांक :04-Jun-2019
नवी दिल्ली,
मॅकडोनाल्डच्या बर्गरमध्ये पाच वर्षांपूर्वी अळ्या सापडल्या होत्या. या प्रकरणात मॅकडोनाल्डला संबंधित ग्राहकाला ७० हजार रुपये भरपाई द्यावी लागणार आहे. जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल कायम ठेवत दिल्लीच्या राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगानं ग्राहकाला भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

पूर्व दिल्लीत राहणारे संदीप सक्सेना १० जुलै २०१४ रोजी नोएडातील जीआयपी मॉलमधील मॅकडोनाल्डमध्ये गेले होते. तेथे त्यांनी बर्गर घेतला. तो खाल्ल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी बर्गरमध्ये पाहिलं असता, त्यांना अळ्या सापडल्या. थोड्या वेळानं त्यांना उलटीचा त्रास होऊ लागला. त्यांनी मॅनेजरच्या कानावर ही बाब घातली. तसंच पोलिसांनाही बोलावून घेतलं. काही वेळानं सक्सेनांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अन्न निरीक्षकही आले. बर्गर खाण्यासाठी योग्य नसून, त्यात अळ्याही आढळून आल्या होत्या, असा अहवाल निरीक्षकांनी दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगानं घेतली होती. सक्सेना यांना भरपाईपोटी ७० हजार रुपये देण्याचे आदेश आयोगानं मॅकडोनाल्डला दिले. त्यात ८९५ रुपये उपचारखर्च, मानसिक त्रासापोटी ५० हजार रुपये आणि खटल्यावरील २० हजार रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. ६० दिवसांच्या आत भरपाई न दिल्यास ९ टक्के व्याज द्यावा लागेल, असे आदेशात म्हटले आहे.